नागपूर : सीताबर्डी परिसरातील कुख्यात गुन्हेगाराचा मुलगा रेहान अशफाक शेख याने कर्तव्यावर तैनात पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी चढवत कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी गावात घडला.
या प्राणघातक हल्ल्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणात तरुणाला तातडीने जेरबंद करण्यात आले. कोराडी नाका ते नागपूर दरम्यानच्या मार्गावर शनिवारी २३ ऑगस्ट दुपारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला.
एक संशयास्पद वाहन या परिसरातून जाणार असल्याचा सुगावा लागल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक सुधाकर पटमासे हे स्वतः रस्त्यावरून जाणारी वाहने तपासत होते.कर्तव्यावर असताना त्यांनी संशयास्पद एक कार थांबवण्याचा प्रयत्न केला. ही कार रेहान अशफाक शेख हा चालवत होता. त्याने पोलीस वाहन थांबवण्याचा इशारा करत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत रेहानने आपली कार वेगाने पळवत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पटमासे यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. रेहानने दिलेल्या धडकेत पटमासे यांना गंभीर दुखापत झाली. ही धडक देऊन वाहनचालक रेहान घटनास्थळावरून पळाला. घटनेच्या वेळी रेहानसोबत आणखी एक जण त्याच्या शेजारी बसला होता. या अपघातात पटमासे यांचा खांदा मोडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी त्यांना तडक मानकापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
नंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणणे यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करत आरोपी रेहान शेख याला अटक केली. पोलीस सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पोलीस अधिकाऱ्याला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेहानचा पिता सीताबर्डी परिसरातील कुख्यात गुन्हेगार आहे, त्याच्याविरोधातही खून आणि गांजा तस्करीसारखे गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत. सध्या कोराडी पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुन्हा तीन महिलांवर अत्याचार
महिलांवरील अन्यायाच्या घटनांनी उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर पुन्हा एकदा हादरले. प्रतापनगर हद्दीत एका बारमध्ये भांडी धुण्याची कामे करणारी महिला घरी निघाली असता तिला निर्जन स्थळी गाठत नराधमाने तिच्यावर आधी बलात्कार केला. नंतर तिची पर्स, गळ्यातील चेन आणि कानातले हिसकावून पळ काढला. बेलतरोडी पोलीस हद्दीत सोबत शिकणाऱ्या तरुणाने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केला. तर मानकापूर परिसरात सोबत काम करणाऱ्याने दिलेला लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतरही तरुणाने मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे मुख्यमंत्र्यांचे शहर मुलींसाठी सुरक्षित राहिले नाही, का असा सवाल उपस्थित होत आहे.