नागपूर : मागील आठवड्याची सुरुवात उपराजधानीसाठी मुसळधार पावसाने झाली. एक-दोन नाही तर सलग चार दिवस पावसाने मुक्काम ठोकला. बुधवारच्या संध्याकाळनंतर पाऊस ओसरला आणि पुन्हा एकदा उकाड्याने डोके वर काढले. पूर्ण उन्हही नाही आणि पूर्ण पाऊसही नाही अशी नागपूरची स्थिती होती. पावसाने उघडीप दिल्याने विदर्भात कमाल तापमानाचा पारा पस्तीशी पार गेला. उकाड्यात देखील वाढ झाली. त्याचवेळी राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.

भारतीय हवामान खात्याने मात्र आज गुरुवारी विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या पावसांच्या सरींची शक्यता वर्तवली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर आणखी एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून काही किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मोसमी पावसाचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील कमी दाबाचे केंद्र, ग्वालिअर, उत्तर प्रदेशातील कमी दाबाचे केंद्र, पुरुलिया ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

बुधवारची स्थिती काय

बुधवारी, १६ जुलैला सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, रोहा आणि ताम्हिणी येथे राज्यातील उच्चांकी २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

विदर्भात तापमान

पावसाची उघडीप असल्याने विदर्भात कमाल तापमान तापदायक ठरत आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.९ अंश तापमान नोंदले गेले. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नागपुरात पाऊस

मात्र, उपराजधानीत सकाळी सूर्यनारायणाने डोके वर काढले असताना दहा वाजताच्या सुमारास वातावरणात एकदम बदल झाला. एकीकडे उन्ह तर एकीकडे पाऊस अशी स्थिती शहरात होती. सकाळी तब्बल अर्धा तास पाऊस कोसळला आणि या अर्ध्या तासात शहरातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे नागपूरकरांना आता पावसाची धडकीच भरली आहे. त्यानंतर दिवसभर पाऊस हजेरी लावून आहे.

पावसाचा ‘येलो अलर्ट’ कुठे

आज, गुरुवारी मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.