नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण २७८ नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ६५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र ठरले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तन्मय तानाजी कटुळे हे राज्यातून प्रथम आले आहेत.
मागासवर्गवारीमधून पुणे जिल्ह्यातील किसवे किशोर चंद्रकांत हे राज्यात प्रथम आले आहेत तर महिला वर्गवारीमधून सांगली जिल्ह्यातील गावडे दुर्गा विजयराव या राज्यात प्रथम आल्या आहेत.
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. या संवर्गाकरिता प्रतीक्षायादी कार्यान्वित राहणार नाही. अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयोगाने कळविले आहे.
परीक्षेवरून निर्माण झाला होता मोठा वाद
एमपीएससी’च्या वतीने आठ हजारांहून अधिक पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये गट-क लिपिक टंकलेखक पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. यानंतर उमेदवारांची एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा, डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा तर जुलै २०२४ मध्ये ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षा घेण्यात आली. परंतु, कौशल्य चाचणीच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली होती.
त्यानंतरही पवई, मुंबई येथील परीक्षा केंद्रावर १० आणि ११ जुलै रोजी इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी देत असताना ‘कीबोर्ड’मध्ये अडचणी आल्या. ‘किबोर्ड’मधील ‘बॅकस्पेस’, ‘शिफ्ट’ बटन आणि अन्य बटनांमध्ये टंकखेलन करताना अडचणी येत होत्या. अनेकदा ‘स्पेस’ बटन पुढे जात नव्हती तर कधी बटन दबत नव्हती. विद्यार्थ्यांनी आयोगाच्या नियमावलीनुसार परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ‘कीबोर्ड’ बदलून देण्याची विनंती केली. परंतु त्यांनी ते ‘कीबोर्ड’ बदलवून दिले नाहीत. ‘कीबोर्ड’च्या खराब बटणांमुळे निर्धारीत वेळत टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही.
त्यामुळे पूर्व व मुख्य परीक्षेत पात्रता गुणांपेक्षा अधिक गुण असूनही उमेदवारांचे टंकलेखन परीक्षेत मोठे नुकसान झाले होते. या गोंधळाविरोधात काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर आयोगाने फेब्रुवारी २०२५ मध्ये ५००६ विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. तसेच पसंतीक्रम यादीही जाहीर केली. मात्र, अंतिम निकाल आणि शिफारशीची प्रक्रिया रखडली होती. अखेर आयोगाने निकाल जाहीर केला.