नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी बंगळुरू स्थानकावरून अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत, केएसआर बंगळुरू-बेळगाव वंदे भारत आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत या रेल्वेगाड्यांचा शुभारंभ केला जाणार आहे. अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही ८८१ किमी अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी असेल.

अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत ही विदर्भातील चौथी वंदे भारत रेल्वेगाडी असून तिला वर्धा-अकोला-शेगाव-भुसावळ-जळगाव-मनमाड व पुनतांबा-दौंड येथे थांबे असतील. नागपूर-पुणे दरम्यान ७३ किमी प्रतितास वेगाने धावणारी ही सर्वात जलदगती गाडी आहे.

गाडी क्रमांक २६१०१ पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस ११ ऑगस्टपासून आठवड्यातून सहा दिवस (मंगळवार वगळता) सकाळी ६.२५ वाजता पुणे येथून सुटून संध्याकाळी ६.२५ वाजता अजनी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक २६१०२ अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस १२ ऑगस्टपासून आठवड्यातून सहा दिवस (सोमवार वगळता) सकाळी ९.५० वाजता अजनी येथून सुटून रात्री ९.५० वाजता पुणे येथे पोहोचेल.

ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर व दौंड येथे थांबणार आहे. या गाडीला एकूण ८ डबे राहतील. त्यामध्ये एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार, सात चेअर कार अशी एकूण ५९० प्रवासी क्षमता असेल.

पुणे-रिवा रेल्वेगाडी सुरू

पुणे-नागपूर या अत्यंत व्यस्त रेल्वे मार्गावर आणखी एक रेल्वेगाडी (हडपसर-रिवा) सुरू करण्यात आल्याने विदर्भातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सोबतच या रेल्वेगाडीमुळे मध्यप्रदेश आणि पुण्यात संपर्क वाढणार आहे. विदर्भातील मोठ्या संख्येने युवक-युवती पुण्याला नोकरी, शिक्षणासाठी आहेत. त्यामुळे नागपूर-पुणे रेल्वेगाड्यांना कायमच गर्दी असते. या मार्गावरील खासगी बसगाड्यांना देखील मोठी मागणी आहे. या मार्गावर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी होती. त्या मागणीची दखल रेल्वेने घेतली आहे.

मध्य रेल्वेद्वारे मध्यप्रदेशातील रीवा आणि महाराष्ट्रातील हडपसर (पुणे) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाडी सेवा सुरू करण्यात आली आहे. ही नवीन सेवा दोन राज्यांतील संपर्क सुधारण्यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या गाड्यांमुळे उत्तर मध्यप्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व इतर प्रवाशांना काम, शिक्षण, पर्यटन आदी कारणांसाठी प्रवास करण्यास सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.