नागपूर : सरकारवर टीका करणाऱ्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेला नागपूरच्या पुरीचा गणपती यंदाही ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘शेतकरी आत्महत्या’च्या मुद्यावर केंद्र व राज्य सरकारवर प्रहार करणाऱ्या देखाव्यामुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे पोलिसांकडून हे देखावे जप्त केले जातात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नागपुरातील पाचपावलीमधील चंद्रशेखर आझाद गणेशोत्सव मंडळातर्फे हे देखावे तयार करण्यात आले आहेत. या मंडळाचे हे ६७ वे वर्ष आहे. पूर्वी हा गणपती गुलाबपुरींचा गणपती म्हणून ओळखला जातो व तो सरकार विरोधी वादग्रस्त देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा त्याचे देखावे पोलीस जप्त करतात.
आता हीच परंपरा गुलाब पुरी यांचे पुत्र चंद्रशेखर पुरी पुढे नेत आहेत. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पुरीच्या गणेशाची प्रतिष्ठापना होते. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या देखाव्याबाबत उत्सूकता असते. यंदा गुरवारी संध्याकाळी पाचपावलीतील नंदगिरी मार्गाावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या देखाव्यातून ऑपरेशन सिंदूर, शेतकरी आत्महत्या या मुद्यांवरील देखाव्यातून केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे.
भारत -पाक युद्ध आपण थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. याविषयावर ‘भारत के प्रमुख-मूक दर्शन’ असा देखावा तयार करण्यात आला आहे. व्यात ‘केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून एक पुतळा तयार करण्यात आला असून त्याच्या मागे डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र असलेल्या फलकावर ‘ऑपरेशन सिंदूर तो रुकाया,अब देश चलायेगे क्या ट्रम्प? असे लिहिले आहे. गणपतीची मूर्ती शेतकऱ्याच्या वेशातील असून त्याच्या पायाशी फलक लावण्यात आला आहे. त्यावर ‘आई-वडिलाला फासावर लटकवणारे सरकार’ असे लिहिले आहे. मूर्तीच्या मागे एक मोठा कापडी फलक लावला असून त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे व फलकावर ‘विदर्भ कल्याण का ढोंग बंद करो’ असे लिहिले आहे. गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर थोड्याच वेळात तेथील देखाव्यांची चर्चा शहरभर सुरू झाली.