भंडारा : जिल्ह्यात कडक शिस्तीचा अधिकारी नसेल तर आमदारही सुधारणार नाहीत. भंडाऱ्यातील पोलीस अधीक्षकांना टिकवा, नाहीतर मी तुम्हाला सुधारणार, अशी तंबी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदेंचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिली.
भंडाऱ्यातील बायपास लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित सभेच्या वेळी नितीन गडकरी, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन एका मंचावर असताना गडकरींनी नुरुल हसन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
काल भंडारा दौऱ्यात नितीन गडकरी यांच्या हस्ते ८४ हजार कोटी रुपये किंमतीच्या मौदा-वाय जंक्शन सहापदरी उड्डानपूलाचे तसेच ७३५ कोटी रुपये किंमतीच्या भंडारा बायपासचे लोकर्पण करण्यात आले. तसेच भंडार येथे ११०० कोटींच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकर्पण व भूमिपूजन देखील नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.
भंडारा शहरालगत १५ किलोमीटर लांबीच्या बायपास महामार्गाच्या उद्घाटनाच्या गडकरी वैनगंगा नदीच्या पुलावर आले असताना पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी त्यांना सॅल्यूट केले. तेवढ्याच तत्परतेने नितीन गडकरी यांनीही त्यांनख नमस्ते म्हणाले.
गडकरी म्हणाले, नुरुल हसन हे चांगले अधिकारी आहेत. त्यावर आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, आम्ही त्यांना सांभाळत आहोत आणि सोबत आहोत. भोंडेकरांच्या प्रत्युत्तरानंतर नितीन गडकरींनी हसत हसत त्यांना दम भरला की, ‘तुम्ही जर एसपींना सांभाळलं नाही तर आम्ही तुम्हाला सुधारू , कडक शिस्तीचा अधिकारी नसला तर, आमदारही सुधारणार नाहीत.’ तसेच पोलीस अधिक्षकांना टिकवले नाही तर आम्ही तुम्हाला सुधारून टाकू’, असे गडकरी यांनी म्हटले.
नूरुल हसन हे मूळचे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील आहेत. प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. भंडारा येथे कार्यभार स्वीकारल्यापासून, त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय, दारु, सट्टेबाजी, जुगार अड्डे आणि गायींची तस्करी यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केली आहे. त्यापूर्वीही वर्धा येथे पोलीस अधीक्षक असताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. दरम्यान या सर्वांमुळे नुरुल हसन मात्र प्रचंड भारावले आणि त्यांनी गडकरींचे आभार मानले.