चंद्रपूर : बोगस नावाने केलेली मतदार नोंदणी माझ्या स्वत:च्या मोबाईलवरून केलेली नाही. पण, यासाठी मला ओटीपी मागण्यात आला होता आणि मी तो दिला होता. एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे राजुरा विधानसभा मतदार संघात राजकारणात सक्रीय आणि एका विशिष्ट पक्षासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला ओटीपी दिल्याची माहिती एका व्यक्तीने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिल्याने खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्ती कोण, कोणत्या पक्षात सक्रीय आहे हे सांगण्यास या व्यक्तीने नकार दिला. दरम्यान बोगस मतनोंदणी प्रकरणानंतर पोलीसांनी संबंधित गावात जावून तपास काय साधी चौकशी केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभा मतदार संघातील बोगस मतदार नोंदणीचे प्रकरण पत्रपरिषदेच्या माध्यमातून उघड केल्यानंतर हा मतदारा संघ आणि मतचोरीचा मुद्दा पून्हा एकदा चर्चेत आला आहे. या मतदार संघातील ग्रामस्थंनी माध्यमांना धक्कादायक माहिती दिली आहे.
बोगस मतदार नोंदणी प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०२४ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. ही बोगस मतदार नोंदणी रद्द झाली असली, तरी हा प्रकार कुणी केला? कोणत्या उद्देशानं केला गेला? अशा बोगस नावांची नोंदणी कोणी केली? याचा शोध पोलिसांना मागील अकरा महिन्यात घेता आलेला नाही.
पण, पोलिस एफआयआरमध्ये काही मोजक्या बोगस नावांच्या खाली हा अर्ज कोणी ऑनलाईन सबमिट केलेला आहे त्याचे नाव लिहिलेलं आहे. तसेच रद्द झालेल्या यादीत लालाजी केवत या मतदाराचा नोंदणी फॉर्म बंडू नावाच्या व्यक्तीनं भरलेला आहे असे दिसत आहे. या नोंदणीच्या खाली ‘बंडू सबमिटेट धीस फॉर्म’, दुसऱ्या नावाच्या खाली ‘गंगाधर सबमिटेड धीस फॉर्म’ असं लिहून संबंधित व्यक्तींचा मोबाईल क्रमांकही दिला आहे. सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क करून ती व्यक्ती कुठली आहे, त्यांचं नाव हेच आहे का? याची माहिती घेतली.
विशेष म्हणजे या व्यक्तीने कृपया माझी ओळख कुठेही सांगू नका अशी विनंती करित ही माहिती दिली आहे. बोगस मतदारांची नोंदणी माझ्या मोबाईलवरून झालेली नसली तरी ओटीपी मागितला गेला होता, ओटीपी मागणारा व्यक्ती हा एका विशिष्टराजकीय पक्षाचा होता हे देखील त्याने सांगितले. विशेष म्हणजे या व्यक्तीने अशा बोगस मतदारांची नोंदणी केली की त्याच्याकडून कुणी करवून घेतली हा चौकशीचा भाग आहे.
मात्र पोलीस अकरा महिन्यानंतरही या अशा व्यक्तींपर्यंत पोहचलीच नाही.संबंधित व्यक्तीला पोलीस एफआयआरमध्ये मतदार नोंदणी अर्ज सबमिट केल्याच्या उल्लेखात त्याचे नाव आहे याची माहिती देखील नाही. या बोगस मतदार यादीत अनेक अशा नावांचा समावेश आहे की संबंधित व्यक्तीचे मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर वास्तव्य नाही किंवा पत्ताच खोटा दिलेला आहे.
दरम्यान कॉग्रेस कार्यकर्ते सूरज ठाकरे यांनी माहिती अधिकारातून मिळविलेल्या यादीत ११ हजार मतदारांच्या यादीत एकाच व्यक्तीची दोन, तीन वेळा नोंदणी झाली आणि त्यांना वेगवेगळे व्होटर आयडी नंबर मिळाल्याचे यादीवरून दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या बोगस मतदार नोंदणीच्या खऱ्या सूत्रधारापर्यंत पोलिसांनी पोहचावे अशी मागणी माजी आमदार तथा जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांनी केली आहे.
राजुरा शहरात एकुण ३१९५ बोगस मतदार नोंदणी झाली तर मतदार संघातील गडचांदूर ११२२, कोरपणा ६६२, लखमापुर ४०७, जिवती १३५, नांदा ३८३, बाखर्डी ७९ अशा अनेक बूथवर बोगस मतदार नोंदणी झालेली आहे. हे धक्कादायक असून यामागचा खरा सूत्रधार कोण आहे, यात राजकीय पक्षाचा सहभाग आहे काय, ११ महीने झाले तरी कार्यवाही का केली जात नाही अशी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ६१ लाख रुपयांची रोकड व प्रचार साहित्य पकडण्यात आले होते. या संदर्भात गुन्हा नोंदवूनही आजपर्यंत संबंधित उमेदवारावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही असे कॉगेसचे जिल्हायध्यक्ष धोटे यांचे म्हणणे आहे.