अमरावती : विदर्भातील जनतेत आंदोलनाचा ‘करंट’ आहे. हा ‘करंट’ शासन आणि प्रशासनाला जाणवला नाही, तर हक्काच्या लढाईसाठी अधिक उग्र आंदोलन करावे लागेल, असा निर्धार राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राकेश टिकेत यांनी व्यक्त केला. बळीराजाच्या सातबारावर कर्जमुक्तीचा अभिषेक आणि शेतमालाला रास्त हमीभाव मिळाल्याशिवाय आता ही लढाई थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. आत्महत्येच्या गर्तेत अडकलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी आता आत्महत्येची नाही, तर हक्कासाठी लढाईची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथे झालेल्या शेतकरी-शेतमजूर महिला सभेत देशभरातील शेतकरी नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मंचावर राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राकेश टिकेत, डॉ. अशोक ढवळे, महादेव जानकर, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, राजन क्षीरसागर, विजू कृष्णन, युद्धवीरसिंग, तेजिंदरसिंग विर्क, किशोर ढमाले, विजय कुंभार, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर यांच्यासह देशभरातील शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.संघर्षाशिवाय पर्याय नाही या सभेत बोलताना राकेश टिकेत यांनी विदर्भातील शेतकरी आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे, असे म्हटले. तसेच, गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण संघर्ष करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या भूमिकेचे कौतुक करताना, महाराष्ट्रातील प्रत्येक लढ्यात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू, अशी ग्वाही टिकेत यांनी दिली.
सात महिन्यांपासून संघर्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागील सात महिन्यांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सरसकट कर्जमुक्तीकरिता अमरावती येथे वाडा आंदोलन, रायगड येथे तीन दिवस अन्नत्याग आंदोलन, लोकप्रतिनिधींच्या घरासमोर टेंभा आंदोलन, मोझरी येथे सात दिवस अन्नत्याग आंदोलन, त्यानंतर कृषिमहर्षी पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ ते साहेबराव करपे-पाटील यांच्या चिलगव्हाण (जि. यवतमाळ) या गावापर्यंत सातबारा कोरा यात्रा आदी आंदोलने त्यांनी राबविली आहेत.
शेतकरी, शेतमजूरांनी आंदोलनात सहभागी होण्याची गरज आहे. शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या भूमीत बच्चू कडूंसह प्रत्येक आंदोलनात सामील होण्याचा विश्वास राकेश टिकेत यावेळी दर्शविला. देशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा एकीकडे गाजावाजा होत आहे. दुसरीकडे १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात शेतकरीहिताचे सरकार नसल्याने आंदोलनाशिवाय मार्ग नाही, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला. सभेत सुनीता झिंगरे, स्टेला, अलका शहाणे, प्रीती गाडगे, किरण ठाकरे, लीना गुडदे, सुलक्षणा शिंदे यांच्यासह अनेक महिला नेत्या उपस्थित होत्या.