नागपूर: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करणारी गंभीर घटना घडली.

यावर देशभरातून संतत्प प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या घटनेचा निषेध केला. मात्र, नुकताच शंभरावा विजयादशमी उत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तन हा विषय हातात घेतला आहे. यामध्ये सामाजिक समरसतेला महत्त्व दिले आहे. असे असतानाही संघाकडून अद्यापही कुठलीही प्रतिक्रिया का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच बूट फेकून मारणारा वकील राकेश किशोर असल्यामुळे संघ शांत आहेत का?, याठिकाणी जर मुस्लीम समाजातील आरोपी असता तर संघ शांत असता का?, ही शांतता म्हणजे धर्माच्या नावावरून किशोर याने केलेला हल्ला संघाला मान्य आहे का?, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या संघाच्या कार्यक्रमात कायदा हातात घेऊ नका, गुंडगिरी करू नका असे आवाहन केले होते. मात्र, प्रत्यक्षात सर्वाेच्च न्यायालयात दलित समाजातून आलेल्या सरन्यायाधीशांवर इतका मोठा हल्ला झाल्यावरही संघ शांत का?. यामुळे संघाचे जाहीर भाषण आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये अंतर असल्याचा आरोप काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी केला.

तसेच केंद्र सरकार एकीकडे न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचूक यांना अटक करते. आणि दुसरीकडे देशाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्यांना मोकळे कसे सोडून शकते असाही प्रश्न त्यांनी केला. हल्ला करणारा राकेश किशोर नाही तर मुस्लीम असता तर संघ शांत राहिला असता का?, भाजपने हा राजकीय विषय केला असतो. केंद्र सरकारने सरन्यायाधीशांच्या प्रकरणात स्वत: कारवाई करणे अपेक्षित होते? मात्र, असे झाले नाही, असाही आरोप करण्यात आला. तसेच संघ यावर आतातरी प्रतिक्रिया देणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणी काय प्रतिक्रिया दिली?

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी निषेध केला. खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले, “सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला हा आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि संविधानाच्या मूलभूत भावनेवर हल्ला आहे. आपल्या देशात अशा द्वेषाला स्थान नाही आणि या घटनांचा निषेध केलाच पाहिजे.”

काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून जारी केलेल्या निवेदनात सोनिया गांधी म्हणाल्या, “सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. हा हल्ला केवळ त्यांच्यावर नाही, तर आपल्या संविधानावर आहे. सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेली नम्रता उल्लेखनीय आहे, परंतु देशाने तीव्र वेदना आणि संतापाच्या भावनेसह त्यांच्यासोबत एकजुटीने उभे राहिले पाहिजे.”