नागपूर : विदर्भात वाळू माफियांनी हैदोस घातला असतानाही महसूल विभाग आणि पोलीस खाते मात्र वाळू तस्करीकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वाळूचा अवैध उपसा होत आहे. तेथून नागपुरात येणाऱ्या वाळूच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचवेळी नियमानुसार ‘रॉयल्टी’ भरून मध्य प्रदेशातून नागपुरात येणाऱ्या वाळूवर मात्र कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या अवैध प्रकाराला कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न ट्रान्सपोर्ट युनियन वाहन चालक-मालक संघटनांनी केला आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमानुसार, ९ जून (पावसाळ्यात) पासून नदीत उत्खनन बंद करणे बंधनकारक आहे. परंतु ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील वाळू घाटावर अद्यापही उत्खनन सुरू आहे. येथील वाळू रोज भिवापूर, उमरेडमार्गे नागपुरात आणली जाते.

विशेष म्हणजे, आवळगाव घाटावरून वाळूचा उपसा करणाऱ्यांकडे केवळ दोन ‘ब्रास’ची ‘रॉयल्टी’ आहे. मात्र, ते दररोज एक हजारांहून अधिक फूट वाळू नेतात.

आवळगाव घाट येथे २४ जून २०२५ रोजी नदीत उत्खनन सुरू असल्याची आणि तेथील वाळू अनेक वाहनांमध्ये भरली जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाली. याप्रकरणी सखोल तपास करावा आणि आवळगाव घाट कंत्राटदाराविरुद्ध, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या विरोधातही कारवाई करावी, अशी मागणी वाहतूकदार संघटनेने केली आहे.

महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात अवैध वाळू !

रात्री होणारी वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने धोरणात सुधारणा केली आहे. त्यानुसार वाळूची वाहतूक २४ तास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवीन वाळू धोरणानुसार, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये ‘जीपीएस डिव्हाईस’ बसवणे बंधनकारक आहे. तसेच अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी ‘महाखनिज पोर्टल’वरून २४ तास ‘ईटीपी’ तयार करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असतानाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या जिल्ह्यातच वाळूची तस्करी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागपूर महसूल विभागाचे अधिकारी आणि नागपूर ग्रामीण पोलीस कारवाई करत आहेत. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? मध्यप्रदेशातून रामटेकमार्गे येत असलेले वाळूचे ट्रक कोणाच्या सांगण्यावरून अडवले जातात? चंद्रपूर जिल्ह्यात वाळूमाफिया बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करत आहेत. त्यावर विरोधी पक्षाचे नेते मौन का, असे प्रश्न वाहतूकदारांच्या संघटनेने उपस्थित केले आहेत.

पावसाळ्यातील वाळू तस्करीला आवर घालण्यासाठी नागपूर ग्रामीणमधील नऊ पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. भिवापूर, कुही, मौदा, भंडारा मार्ग, देवलापार, रामटेक आणि कन्हान या मार्गावरील वाळू वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. कारवाईत कसूर आढळल्यास संबंधित ठाणेदारांना जबाबदार धरले जाते. आसोलीत अलिकडेच वाळू तस्करीप्रकरणी ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली. – हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.