अकोला : अतिवृष्टीचा तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना देखील मोठा फटका बसला आहे. पावसाचा रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल केला. त्यामध्ये अकोला-तिरुपती एक्सप्रेसची ३१ ऑगस्टची अकोला ते काचीगुडादरम्यानची फेरी रद्द करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात गाड्या रद्द करण्याचे प्रमाण वाढल्याने रेल्वे प्रवाशांना चांगल्याच मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
हैदराबाद विभागातील भिकनूर – तळमडला आणि अक्कनपेट-मेडक विभागामध्ये काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य दक्षिण रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला. ३१ ऑगस्ट रोजी अकोला येथून सुटणारी ०७६०६ अकोला-तिरुपती एक्सप्रेस रद्द करण्यात आली. ही गाडी काचीगुडा ते तिरुपती दरम्यान धावणार आहे. नांदेड – जम्मू तावी –नांदेड हमसफर एक्स्प्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.
जम्मू विभागातील झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर परिणाम झाला. यामुळे ३१ ऑगस्ट रोजी जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक १२७५२ जम्मू तावी – हुजूर साहिब नांदेड हमसफर एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली. ३० ऑगस्ट रोजी गाडी क्र. ७७६१३ पूर्णा – अकोला, गाडी क्र. ७७६१४ अकोला – परळी, ३१ ऑगस्ट रोजी गाडी क्र. ७७६१५ परळी – अकोला, ३० ऑगस्टला गाडी क्र. ७७६८३ अकोला – पूर्णा, गाडी क्र. ७७६०७ अकोला – अकोट, गाडी क्र. ७७६०८ अकोट – अकोला आदींसह अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेल्या वाहतुकीच्या परिणामी काही गाड्यांच्या नियोजित मार्गात बदल करण्यात आला. त्यामुळे अनेक स्थानकांवरून या गाड्या धावणार नाहीत. काचीगुडा ते भगत की कोठी सुपरफास्ट एक्सप्रेस मार्गातही बदल झाला असून निजामाबाद – अकोला या नियोजित मार्ग ऐवजी बल्लारशाह, वर्धा, अकोला मार्गे ही गाडी वळविण्यात आली आहे. गाडी क्र. ०७०२० हैदराबाद – जयपूर एक्सप्रेसच्या मार्गातही बदल केला. ही गाडी सिकंदराबाद – अकोला मार्ग ऐवजी सिकंदराबाद – काझीपेठ – बल्लारशाह – वर्धा – अकोला मार्गे वळविण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक संपूर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत असून त्यांचे चांगलेच हाल होत आहेत.