चंद्रपूर : ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. नागपूर येथे १० ऑक्टोबरला ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे. मोर्चाची तारीख जाहीर केली तेव्हापासून काही लोक वारंवार फोन करून मला घाणेरड्या शिव्या देत आहेत. त्यामुळे मी फोन उचलणेच बंद केले.

मराठा समाजाने आपली भूमिका मांडली तेव्हा आम्ही असा प्रकार केला नाही. मात्र, आम्ही ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असल्याने आम्हाला शिव्या दिल्या जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

जोड देऊळ येथे आज, गुरुवारी ओबीसी समाजाची बैठक पार पडली. बैठकीला आमदार वडेट्टीवार यांच्यासह खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले तथा जिल्ह्यातील अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, त्याला आमचा विरोध नाही. मात्र ओबीसी समाजात मराठ्यांचा समावेश करू नये, ही भूमिका आजही आहे. परंतु सरकारच्या अध्यादेशामुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार आहे. आमचा याला विरोध आहे.

हा विरोध दर्शविण्यासाठीच समस्त ओबीसी समाज १० ऑक्टोबला नागपुरात मोर्चाच्या माध्यमातून एकत्र येत आहे. हा मोर्चा निघणार असे जाहीर केले तेव्हापासून घाणेरड्या शिव्या देणाऱ्याचे फोन येत आहेत. मी मराठा समाजाच्या अथवा जरांगे पाटील यांच्या विरोधात नाही. आमचा लढा हा ओबीसी समाजासाठी आहे. नागपूर येथे १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरात आज झालेली बैठक यशस्वी झाली. सर्व ओबीसी समाजातील विविध समाजाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. मोर्चा नियोजनाची ही बैठक फार महत्त्वाची होती असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

फोन उचलणेच बंद केले

या बैठकीदरम्यान वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, काही लोक वारंवार मला फोन करून घाणेरड्या शिव्या देत आहेत. त्यामुळे आता मी लोकांचे फोन उचलणंच बंद केलं आहे. मराठा समाजाने आपली भूमिका मांडली तेव्हा आम्ही असा प्रकार केला नाही. मात्र आता आम्ही ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ठामपणे उभे आहोत. त्यावरून काही जण मला लक्ष्य करीत आहेत. आम्ही कधीच अशा पातळीवर गेलो नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांनीही भान ठेवावे. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढत राहणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिव्या देऊन कोणत्याही समाजाची प्रगती होत नाही. हा प्रकार योग्य नाही. शिवीगाळ करणे हे प्रगत समाजाचे लक्षण नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

सरकारने दखल घ्यावी

माझ्या मोबाईलमध्ये अनेकांनी शिवीगाळ केल्याचे सेव्ह आहे. मी सरकारला पत्र देणार नाही, कुणाचे भ्रमणध्वनी क्रमांक देणार नाही. पण सरकारने याची दखल घ्यावी. आम्ही कधीच मराठा समाजाला अथवा जरांगे पाटील यांना अशाप्रकारे शिवीगाळ केली नाही. मात्र ओबीसींसाठी लढा लढताना आता आम्हाला शिव्याशाप दिला जात आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.