लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: शासकीय सेवेत दलित, आदिवासी, ओबीसी व खुल्या गटात किती भरती झाली याची आकडेवारी आपण मांडली होती. सचिवांनी चुकीचे मार्गदर्शन केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते वास्तव नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आपण उत्सफुर्तपणे प्रतिवाद करीत आपल्याकडे माहिती नाही असे होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. घरात आपले मुद्दे ठामपणे मांडण्यासाठी मोठ्या आवाजात बोलले जाते. बैठकीतील या घडामोडींचा पराचा कावळा, राईचा पहाड करण्यात आला. अजितदादांशी आपले कुठलेही मतभेद नाही, अशी सारवासारव अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित दादा व भुजबळ यांच्यात आकडेवारीवरून वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बैठकीतील तो विषय आता संपला असल्याचे नमूद केले. आपण बैठकीत मांडलेली आकडेवारी अधिकृत होती. शासकीय भरतीत मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे. तो भरून काढण्याची गरज मांडताना ती आकडेवारी सादर केली होती. सचिवांनी चुकीचे मार्गदर्शन केल्याने दादा तसे बोलल्याचे यांनी नमूद केले.

हेही वाचा… नाशिक: सर्पदंशासह डोक्याला मार लागून शेतकऱ्याचा मृत्यू

चर्चेत आपली माहिती बरोबर असेल तर प्रतिवाद केला जातो. कधीकधी मोठ्या आवाजात बोलून आपला मुद्दा ठामपणे मांडतो. तसेच बैठकीत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केली. शासकीय सेवेतील संवर्गनिहाय कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती आयोगाकडून संकलित केली जाईल असे त्यांनी म्हटल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, पक्षांतर्गत लढाई मागील काही संदर्भ देऊन हा वाद रंगवला जात आहे. मात्र, तसे काहीही नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… आवाजाच्या भिंतींचा दणदणाट; राजकीय नेत्यांच्या मंडळांचा पुढाकार, १३ तासानंतर विसर्जन मिरवणुकीचा समारोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही. महाराष्ट्रातील जवळपास ४४, इतर राज्यातील आमदारही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे पक्षचिन्ह आमच्याकडे राहणार असल्याचा दावा भुजबळांनी केला. चुकीची ओबीसी प्रमाणपत्र दिली जाणार नाहीत याकडे शासन व ओबीसी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सूचित केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal reaction to the discussion with ajit pawar on participation of obc in government service dvr