नाशिक: देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) विरोधात शिवसेनेने (एकनाथ शिंदे) अधिकृत उमेदवार देण्याची केलेली खेळी पक्षाच्या अंगलट आली आहे. माघारीच्या वेळी उमेदवार संपर्कहीन झाले. पक्षाने अर्ज देऊनही उमेदवारी रद्द झाली नाही. या घटनाक्रमाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे संतापले. त्यांनी पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांना तातडीने नाशिकला पाठवत स्थानिक पातळीवर आढावा घेतला. या प्रकारात पक्षाची नाहक बदनामी झाली असून इतक्या उशिराने निवडणूक लढविणे योग्य नसल्याचा सूर संबंधित बैठकीत उमटल्याचे सांगितले जाते. आता देवळालीबद्दल पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार, याकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवळाली, नांदगाव, दिंडोरी या तीन मतदारसंघांमध्ये महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. नांदगावचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली. त्यास शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या (अजित पवार) विद्यमान आमदारांच्या देवळाली आणि दिंडोरी या जागांवर अधिकृत उमेदवार देत प्रत्युत्तर दिले होते. पण, बंडखोरीचे फडकवलेलेे निशाण माघारीच्या मुदतीपर्यंत खाली उतरवावे लागले. दिंडोरीत शिंदे गटाच्या धनराज महालेंनी माघार घेतली. मात्र, देवळालीत उमेदवार राजश्री अहिरराव यांची माघार होऊ शकली नाही. माघारीच्या दिवशी त्या संपर्कहीन झाल्या होत्या. पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. उमेदवाराच्या स्वाक्षरीचे पत्र नसल्याने ही मान्य अमान्य होऊन अहिरराव याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. एकाच मतदारसंघात महायुतीचे दोन अधिकृत उमेदवार उभे ठाकल्याने महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. नेमका कोणाचा प्रचार करायचा हा प्रश्न शिवसैनिकांसह भाजप व मित्र पक्षांना भेडसावत आहे.

हेही वाचा : नाशिक : जिल्ह्यातील १०७ गुन्हेगारांना मतदार संघात प्रवेशास मनाई

देवळालीच्या जागेवरून निर्माण झालेल्या तिढ्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे संंतप्त झाल्याचे सांगितले जाते. त्यांनी पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरींना नाशिकला पाठविले होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चौधरी यांनी विचार विनिमय केल्याचे सांगितले जाते. प्रारंभी तातडीने एबी अर्ज दिले गेले. नंतर माघार घेण्याची सूचना करूनही उमेदवाराशी संपर्क होऊ शकला नाही. नंतर पक्षाने उमेदवारी रद्द करण्यासाठी अर्ज दिला. अशा परिस्थितीत निवडणूक लढविण्यात आता अर्थ नसल्याची बाब काहींनी सचिवांसमोर मांडली. ठाम निर्णय घेण्यास विलंब झाला असून इतर उमेदवारांच्या प्रचाराच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. पक्षाचा उमेदवार कायम ठेवल्यास भाजप आणि रिपाइं काय करेल, याबाबत अनिश्चितता आहे. सद्यस्थितीत पक्षाने अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणे हाती असल्याचा पर्याय सुचविला गेल्याचे पदाधिकारी सांगतात. ही सर्व माहिती सचिव चौधरी हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडतील आणि त्यानंतर देवळालीबाबत अंतिम निर्णय होणार आहे. गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत त्यासंदर्भात कुठलेही स्पष्ट आदेश नसल्याने गोंधळ कायम राहिला. यासंदर्भात सचिव भाऊ चौधरी यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही ते उपलब्ध झाले नाहीत.

सभेत व्यासपीठावर कोण असणार ?

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन येथील मैदानात जाहीर सभा होत आहे. यावेळी १४ मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. देवळालीत महायुतीचे दोन अधिकृत उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार सभेत व्यासपीठावर असतील का, असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. या सभेपूर्वीच शिवसेना शिंदे गटाकडून निर्णय होणे अपेक्षित आहे. त्याची प्रतिक्षा गुरुवारी दिवसभर पदाधिकारी करीत होते.

हेही वाचा : नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित

राजश्री अहिरराव यांच्याकडून प्रचार प्रारंभ

वरिष्ठांकडून स्पष्ट आदेश आल्याशिवाय कुठल्याही प्रचारात सहभागी व्हायचे नसल्याचे शिंदे गटाने निश्चित केलेले असताना या पक्षाच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांनी गुरुवारी दुपारपासून मतदारसंघात प्रचार सुरू करीत असल्याचे जाहीर केले. गिरणारे, वाडगाव, नाईकवाडी, लाडची येथे प्रचार दौरा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अडथळ्यांची शर्यत पार करून आपण आज प्रचारापर्यंत येऊन पोहोचली आहे. शिवसैनिकांना देवळालीत धनुष्यबाण परत आणावा, असे मनोमन वाटते. त्यासाठी सर्वांनी शर्थीने प्रयत्न करून साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रचारापासून पदाधिकाऱ्यांनी अंतर राखल्याचे सांगितले जाते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde angry on deolali assembly constituency shivsena candidate rajashree ahirrao not reachable css