नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. कधीकाळी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचा गड होता. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेपर्यंत पक्षाचे लोकप्रतिनिधी होते. सद्यस्थितीत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ दोन खासदार आणि एकमेव आमदार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची अगदीच तोळामासा अवस्था आहे. या परिस्थितीत आगामी निवडणुकीत काँग्रेसचे स्थान बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजीमंत्री बाळासाहेब थोरात है मैदानात उतरले आहेत.
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालयात बैठक होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्राचे प्रभारी बी.एम. संदीप, ज्येष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्या अनुषंगाने पक्षाचे नेते जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांची चर्चा करतील. सर्वप्रथम नाशिक शहर, त्यानंतर मालेगाव शहर, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव अशा क्रमाने पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन होणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक होता. या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत लाभ झाला, तसा विधानसभा निवडणुकीत मात्र झाला नाही. सध्या धुळ्यात डॉ. शोभा बच्छाव, नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी हे खासदार आणि नंदुरबारमध्ये शिरीषकुमार नाईक हे एकमेव आमदार आहेत.
नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही. या भागातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेत काँग्रेसचे नाममात्र अस्तित्व आहे. आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविली जाईल की नाही, याची स्पष्टता नाही. नाशिक महापालिकेसारख्या ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढविण्याची भाषा केली जाते. परंतु, गतवेळी येथे पक्षाचे सहा नगरसेवक होते.
शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे हे नवीन समीकरण आकारास येत आहे. या अनुषंगाने वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करतील. बैठकीस शहराचे नवनियुक्त प्रभारी, प्रदेश उपाध्यक्ष सचिन सावंत, आमदार हेमंत ओगले, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्यासह सर्व विभाग, सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी म्हटले आहे.