धुळे : पहिल्यांदाच होणाऱ्या पिंपळनेर (ता. साक्री) नगरपरिषदेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून राजकीय घडामोडींना आता खऱ्याअर्थाने वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ झाली. या प्रवेशामुळे पिंपळनेरमध्ये भाजपाची ताकद अधिक बळकट झाल्याचा दावा भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाकडून होत आहे. यामुळे विरोधकांसाठी ही निवडणूक मोठी परीक्षा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपळनेर येथे झालेल्या सहविचार सभेत जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत विविध पक्ष व संघटनांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पिंपळनेरमधील भाजपाच्या संघटनात्मक शक्तीत वाढ झाली आहे.
या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार कुणाल पाटील म्हणाले की, पिंपळनेर नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नगरपरिषदेतील प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. जनतेशी सातत्याने संवाद ठेवून विकासकामांवर भर दिला जात आहे.
निवडणुकीत जिंकण्याच्या क्षमतेनुसार आणि लोकांचा विश्वास असलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, भाजपा कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास पिंपळनेर नगरपरिषदेवर निश्चितच विजय मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर आहे आणि त्याच वाटचालीत पिंपळनेरचाही समावेश होणार आहे.
सभेत जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सविताताई पगारे, माजी सभापती हर्षवर्धन दहिते, ज्येष्ठ नेते ईश्वर बोरसे, साहेबराव खैरनार, बाजीराव पाटील, भाऊसाहेब देसले, प्रदीप कोठावदे, मोहन सुर्यवंशी, सुधामती गांगुर्डे, प्रमोद गांगुर्डे, बापू खैरनार, संजय ठाकरे, विक्की कोकणी, चंद्रशेखर बाविस्कर, शैलेंद्र आजगे, मोतीलाल पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
सहविचार सभेचे प्रास्ताविक प्रमोद गांगुर्डे यांनी केले. या सभेच्या औचित्याने झालेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पिंपळनेर शहरात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढली असून, आगामी निवडणुकीत झेंडा फडकविण्यासाठी भाजपाचा विरोधी पक्ष काँग्रेस आता नेमकी कोणती रणनीती आखतो याकडे पिंपळनेर वास यांचे लक्ष लागून आहे. या अनुषंगाने आगामी दिवसांत ही राजकीय लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
