जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवडाभरापूर्वी सोने दराने नवीन उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र सोन्यात पुन्हा घसरण सुरू झाली असून, ग्राहकांसह व्यावसायिकही चक्रावले आहेत. दरात सातत्याने होत असलेले चढ-उतार लक्षात घेता सोने खरेदी-विक्रीच्या व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकेने भारतीय आयातीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या किमती नवीन उच्चांकावर पोहोचल्या होत्या. दुसरीकडे, चांदीही एक लाख २० हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली होती. दोन्ही धातुंच्या किमतीत झालेल्या वाढीने ग्राहकांसह व्यावसायिक चांगलेच धास्तावले होते. मात्र, यथावकाश विशेषतः सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाल्याने विक्रेत्यांसह खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी शनिवारी देखील देशभरातील सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले. सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीची मागणी सहसा वाढते; परंतु, शनिवारी सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर डॉलर निर्देशांक आणि दागिन्यांच्या क्षेत्रातील मागणीच्या चढ-उतारांचा एकत्रित परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर झाला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली असली, तरी चांदीच्या किमतींमध्ये स्थिरता दिसून आली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे आणि ग्राहकांचे लक्ष आता चांदीकडे अधिक वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, जागतिक बाजारपेठेत डॉलरची मजबुती आणि बाँड उत्पन्नातील वाढ यामुळे सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे. जळगावमध्ये रक्षाबंधनापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ५४५ रूपयांपर्यंत पोहोचला होता. त्या तुलनेत शनिवारी तब्बल १६४८ रूपयांनी दर कमी झाल्याने सोने एक लाख दोन हजार ८९७ रूपयांपर्यंत घसरले.

सोन्याची किंमत कशी ठरवितात ?

भारतात सोन्याची किंमत ठरविताना आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क, इतर कर, रुपया-डॉलर विनिमय दर, तसेच देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याचा समतोल, या घटकांचा विचार केला जातो. देशात सोने केवळ गुंतवणुकीचे साधन नसून लग्न सोहळा, सण-उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये त्याला विशेष स्थान आहे. त्यामुळे किमतीत होणाऱ्या चढ-उतारांचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर जाणवतो, असे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.