जळगाव – जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येकी पाच जागा जिंकून भाजपसह शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी भाजपला ते अजिबात रूचलेले दिसत नाही. त्यामुळे जेवढ्या काही ठिकाणी शिंदे गटाचे सध्या वर्चस्व आहे, तिथे भाजपने आतापासूनच आपली माणसे पेरण्यास सुरूवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशानंतर पाचोरा तालुक्यापासून त्याची सुरूवात झाल्याची प्रचिती देखील आली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना आधीच घरातून बहीण वैशाली सूर्यवंशी यांचे आव्हान होते. त्यात महायुतीचे घटक पक्ष भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी आमदार दिलीप वाघ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना चांगलेच जेरीस आणले. ठाकरे गटाने केलेली कोंडी आणि मित्रपक्ष भाजप तसेच राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी दिलेले आव्हान, यामुळे शिंदे गटासाठी पाचोऱ्यातील निवडणूक आणखी जास्त आव्हानात्मक बनली.
अर्थात, सर्व आव्हानांवर मात करीत किशोर पाटील यांनी विजयश्री खेचून आणली. मात्र, राज्यात आणि जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसह इतर बऱ्याच कारणांनी महायुतीचे वारे वाहत असताना पाटील यांना एक लाखांच्या आतच मते मिळाली. पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांना ५८ हजार ६७७ तर अमोल शिंदे यांना ५८ हजार ०७१ मते मिळाली होती.
प्रतिस्पर्धी दोन्ही मातब्बर उमेदवारांच्या मतांची बेरीज ही किशोर पाटील यांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा १९ हजाराने जास्त असल्याचे दिसून आले. ही स्थिती लक्षात घेऊनच सूर्यवंशी आणि शिंदे या दोघांना आपल्या पक्षात घेऊन पाचोरा मतदारसंघातील पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या विरोधात भाजप एकच ताकदीचा उमेदवार देण्याची रणनिती आतापासून आखत आहे. गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडी पाहता त्यावर हळूहळू शिक्कामोर्तबही होत आहे.
भाजपने काही दिवसांपूर्वी पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांना पक्षात घेतले तेव्हा शिंदे गटाला फार आश्चर्य वाटले नव्हते. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्या आणि आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
वैशाली सूर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशाविषयी अद्याप शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील किंवा आमदार किशोर पाटील यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, भविष्यात आपल्या अडचणी वाढण्याच्या शक्यतेने शिंदे गटाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दिलीप वाघ, अमोल शिंदे आणि वैशाली सूर्यवंशी, हे सर्व विधानसभेच्या निवडणुकीतील पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपमध्ये असल्यानंतर पुढील विधानसभेची निवडणूक म्हणावी तितकी सोपी शिंदे गटासाठी असणार नाही, हे देखील आता निश्चित झाले आहे. त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवरही पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाचा पाचोरा तालुक्यात चांगलाच कस या पुढील काळात लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.