जळगाव : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मुक्ताईनगर तालुक्यात एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. तसेच पाचोरा तालुक्यातील २०० जनावरे आणि ट्रॅक्टर वाहून गेले. जामनेर तालुक्यातही तीन जनावरे दगावली. नद्यांच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरले. केळी, कापसासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने ४४ गावांमधील ४३२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन ५४८५ शेतकरी बाधित झाले.

जामनेर तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत सरासरी ७२.३ मिलीमीटर आणि पाचोरा तालुक्यात सरासरी ४३.५ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. पैकी जामनेरमधील आठ पैकी चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक १५२.५ मिलीमीटर पाऊस नेरी मंडळात तसेच १००.८ मिलीमीटर तोंडापूर, ८३.३ मिलीमीटर शेंदुर्णी, ७०.३ मिलीमीटर जामनेर, ६६.३ मिलीमीटर वाकडी आणि ५२.८ मिलीमीटर पाऊस फत्तेपूर महसूल मंडळात नोंदविला गेला. पाचोरा तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर महसूल मंडळात ११३.८ मिलीमीटर आणि वरखेडी महसूल मंडळात ११३.८ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला.

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील किरण मधुकर सावळे (३८) हा शेतकरी मंगळवारी सकाळी शेतात कामानिमित्त गेला होता. रस्त्यातील नाला ओलांडत असताना तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. कुऱ्हा, जोंधनखेडा व इतर बऱ्याच गावात घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. जामनेर तालुक्यात संततधार पावसामुळे वाघूरसह इतर नद्यांना पूर आल्याने काठावरील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. नेरीत तीन जनावरे दगावली.

खडकी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने जळगाव-जामनेर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रात्रीपासून शेकडो वाहनधारक रस्त्यावर अडकून पडले. इतरही बरेच रस्ते ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी उभ्या पिकांवर पुराचा लोट फिरला. तर काही ठिकाणी सुपीक शेती खरडली गेली. दरम्यान, पावसाचा जोर थोडा कमी झाल्यानंतर महसूल प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली.

जळगाव व धुळे येथून आपत्ती व्यवस्थापनाची पथके दाखल झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना वेग आला. मंत्री गिरीश महाजन यांनीही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यासह बाधित गावांना भेटी देऊन अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.

पाचोरा तालुक्यात शिंदाड येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसानंतर नदीला आलेल्या पुरामुळे काठालगतच्या गोठ्यांमध्ये बांधलेली सुमारे २०० जनावरे वाहून गेली. विलास बाजीराव पाटील या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर देखील वाहून गेले. तालुक्याच्या दक्षिणेकडील भागात २० ते २५ गावांत घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची संसार उपयोगी भांडी, अन्नधान्य, जनावरांचा चारा वाहून गेला.

सातगाव तांडा, सातगाव डोंगरी, शिंदाड, वाडी, शेवाळे, निंभोरी बुद्रुक निंभोरी खुर्द, पिंपळगाव हरेश्वर, चिंचपुरे, भोजे, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, वरखेडी, लोहारी, बिल्दी, खेडगाव नंदीचे, वेरूळ बुद्रुक वेरूळ खुर्द, पाचोरा शहर, वडगाव टेक, दुधखेडा, परधाडे या गावांत जास्तकरून नुकसान झाले. साधारणतः ३५० ते ४०० कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित केले. शाळांना त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली.