जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी मेहनत घेण्याची ग्वाही सर्वच पक्षांचे नेते देत आहेत. मात्र, नगराध्यक्षांचे प्रमुख पद आपल्याच सौभाग्यवतींना किंवा घरच्या इतर लोकांना मिळाले पाहिजे म्हणून नेते मंडळी विशेष काळजीही घेत आहेत.

जिल्ह्यात भुसावळसह चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, जामनेर, चोपडा, धरणगाव, यावल, रावेर, सावदा आणि फैजपूर, या नगरपालिका आहेत. तसेच मुक्ताईनगर, भडगाव, नशिराबाद आणि शेंदुर्णी, या नगरपंचायती अस्तित्वात आहेत. संबंधित सर्व ठिकाणी नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले असून, लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. जास्तीत जास्त ठिकाणी आपली सत्ता असावी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची नेते मंडळी देखील कामाला लागली आहेत. या दरम्यान, विशेषतः भाजप हा सर्वात मोठा पक्ष युती न नसल्यास स्वबळाचे नारे देत आहे.

मात्र, आपल्यासाठी लोकसभेसह विधानसभेत राबणाऱ्या कार्यकर्त्यांना साथ देण्याची वेळ आली असताना त्यांना पाडण्यासाठी आता प्रयत्न करावे का, असा प्रश्न शिवसेनेसह (एकनाथ शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशी भीती शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः व्यक्त केली आहे. एकूण चित्र लक्षात घेता नेत्यांच्या वक्तव्यांमधून कार्यकर्त्यांचे महत्व वारंवार अधोरेखित होताना दिसते आहे. मात्र, नगराध्यक्षपदाचा विषय निघाल्यानंतर त्या पदावर एखाद्या कार्यकर्त्यांचे नाव घेण्यास कोणताच नेता तयार नाही. विशेष म्हणजे भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय सावकारे यांचाही त्यात समावेश आहे.

जामनेरचे नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही एकदा साधना महाजन या जामनेरच्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत आणि त्यांना त्या पदाचा चांगला अनुभव आहे. याशिवाय, भुसावळचे नगराध्यक्षपद यावेळी अनुसूचित जाती महिला राखीव निघाल्याने त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी मंत्री संजय सावकारे जोर लावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी त्या संदर्भात पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित देखील झाल्या होत्या. प्रत्यक्षात, सावकारे यांनी त्या विषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

चाळीसगावमध्येही नगराध्यक्षपद यंदा खुल्या जागेसाठी आहे. अर्थातच, त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी हालचाली वाढविल्याची चर्चा आहे.

दरम्यान, माझ्या घरातील कोणताच सदस्य निवडणुकीत उभा राहणार नाही, असे आमदार चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केले असले, तरी त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना गळ घालू शकतात. पाचोरा येथेही सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले आहे. अपेक्षेनुसार, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी त्या जागी त्यांच्या सौभाग्यवती किंवा मुलीची वर्णी लावण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, तो निर्णय त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सोपविला आहे. पारोळ्यातही नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी असल्याने शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य तिथे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.