नाशिक – शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने काही दिवसांपूर्वी संयुक्त जनआक्रोश मोर्चाद्वारे ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीकडे लक्ष वेधल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांमधील रोष लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे ) यांच्या पाठोपाठ भाजपही हाच मुद्दा घेऊन मैदानात उतरला आहे.

शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात बैठक घेतल्यानंतर आता भाजपच्या लोकप्रतिनिधींनी वाढती गुन्हेगारी, तरुणाईतील व्यसनाधिनता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करून शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याची मागणी केली आहे.

विरोधी पक्षांनी गुन्हेगारी, अमली पदार्थांची राजरोज विक्री, व्यसनांच्या आहारी जाणारी तरुणाई आदी मुद्यांवरून सत्ताधारी महायुती सरकार विरोधात काही दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. हत्या, लूटमार, टोळक्यांचा धुडगूस आदींमुळे नागरिकांमध्येे भीतीचे वातावरण आहे. सोमवारी कायदा व सुव्यवस्था प्रश्नी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्तालयात बैठक घेत नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे.

गुन्हेगारीला लगाम घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे, रस्त्यावर उतरून तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना केल्या होत्या. शिंदे गटाने या बैठकीतून अप्रत्यक्षपणे गृह विभागाला म्हणजे भाजपला लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

गुन्हेगारीच्या विषयावर भाजपमध्ये शांतता होती. परंतु, भुसे यांच्या बैठकीनंतर भाजपच्या शहरातील तीनही आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नंतर देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि ॲड. राहुल ढिकले या आमदारांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन एकंदर स्थिती गंभीर असून नाशिकच्या भविष्यासाठी चिंताजनक व धोकादायक असल्याचे लक्षात आणून दिले.

राज्यातील सांस्कृतिक, औद्योगिक व शैक्षणिक केंद्र असणाऱ्या नाशिक शहरात शांततेची परंपरा कायम ठेवणे ही काळाची गरज आहे. अलीकडे चोरी, दरोडे, लूटमार, सोनसाखळी खेचणे, एमडीसारखे अमली पदार्थ आणि टोळीयुद्धात लक्षणीय वाढ झाल्याचा मुद्दा भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून मांडला. तरूणाईत व्यसनाधिनता वाढत आहे. अमली पदार्थांच्या सेवनाने तरुणाई गुन्हेगारीकडे ओढली जात असल्याकडे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिक गुन्हेगारीमुक्त कसे होईल ?

शहरातील संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवून २४ तास गस्ती पथकांची नेमणूक करावी, सीसीटीव्हींद्वारे देखरेख, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई, टोळीयुद्ध व गटबाजीवर नियंत्रणासाठी विशेष कार्यबळ स्थापन करावे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोहल्ला समित्या सक्रिय करणे, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित ठोस कारवाई या उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्यास नाशिककरांना दिलासा मिळेल. शहरात शांतता व सुरक्षितता व गुन्हेगारीमुक्त वातावरण पुन्हा प्रस्थापित होईल. पोलिसांनी तात़डीने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.