जळगाव : शहरातील नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था तसेच भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दरवर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केले जाते. यंदाही या परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या तब्बल ११८ विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवण्यात येणार आहे.

गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर आधारित स्पर्धा परीक्षेतून सर्व विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी जानेवारी महिन्यात इस्रो आयआयटी सायन्स सिटी आयआयएम या, शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत. टॅलेंट सर्च परीक्षेत अ गटातून पाचवीच्या वर्गातील आराध्य प्रसाद रानडे (अकोला), तर सहावीच्या वर्गातील देवांशी पद्माकर देवरे (नाशिक) आणि सातवीच्या वर्गातील शंतनू मिलिंद येडगे (कराड, जि. सातारा) हे विद्यार्थी राज्यात प्रथम आले आहेत.

तर पाचवीच्या वर्गातील शरविल विशाल वाणी (नाशिक), सहावीच्या वर्गातील शिवम पाचलिंग (परभणी) आणि सातवीच्या वर्गातील शरविल खोपडे (कोल्हापूर) हे विद्यार्थी राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ब गटातून पुणे येथील आठवीच्या वर्गातील स्नेहल ठोंबरे, नववीच्या वर्गातील धैर्यशील धनंजय दाभाडे आणि दहावीच्या वर्गातील अमेय हरिश्चंद्र जाधव (बोरावडे, जि. कोल्हापूर) हे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर पुणे येथील दीपक वीर (आठवी), कोल्हापूर येथील राजवीर भुंजे (नववी), सोहम लोया (दहावी), गोकर्ण महाजन (दहावी) हे विद्यार्थी राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे यंदा नववे वर्ष आहे. आजपर्यंत या परीक्षेच्या माध्यमातून ८०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी इस्रो भेटीचा आनंद घेतला आहे. मागील वर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि प्रत्यक्ष पेपर पद्धतीने घेण्यात आली होती. तसेच गुणवत्ता यादीतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याद्वारे ११८ विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी, आयआयएम, सायन्स सिटी अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

सदर विद्यार्थी जानेवारी महिन्यात अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, गांधीनगर आयआयटी, आयआयएम, सायन्स सिटी, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी या काही ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी दिली. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून शेकडो विद्यार्थी इस्रो आयआयटीपर्यंत जाणे ही समाजातील मोठी क्रांती नोबेल फाउंडेशनच्या कामामुळे घडत आहे. याच विद्यार्थ्यांमधून भविष्यातील नोबेल पुरस्कार विजेते भारतीय घडतील याची खात्री असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली.