नाशिक – राज्यात महाविकास आघाडीत मनसेचा समावेश होणार की नाही. याबद्दल राजकीय पातळीवर साशंकता व्यक्त होत असली तरी नाशिकमध्ये मात्र भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या विरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी आघाडीत मनसेचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याची घोषणा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करीत वरिष्ठांना एकप्रकारे धक्का दिला आहे.
मतदार याद्यांमधील कथित घोळ, विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि अन्य मुद्यांवरून महाविकास आघाडी व मनसेत एकवाक्यता दिसत होती. तथापि, मनसेच्या परप्रांतीय विरोधी आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आघाडीत त्यांच्या सहभागावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी साशंकता व्यक्त केली होती. शिवसेना (उध्दव ठाकरे) मनसेला बरोबर घेण्यास उत्सुक असताना काँग्रेसच्या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे आघाडीपासून दूर राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मुंबईसह अन्य महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र मैदानात उतरतील, अशी समीकरणे मांडली गेली. आघाडीतील प्रमुख पक्षांनी स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर नाशिकमध्ये मनसेलाही महाविकास आघाडीत सामावून घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात पहिल्यांदा असा निर्णय झाला आहे. सोमवारी महाविकास आघाडी आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांनी आगामी सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे जाहीर केले.
जिल्ह्यात भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड, इगतपुरी, ओझऱ, पिंपळगाव बसवंत आणि त्र्यंबकेश्वर. या ११ नगर परिषदा आणि नगर पंंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात होत असताना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, माकपचे डॉ. डी. एल. कराड, काँग्रेसचे राहुल दिेवे, भाकपचे राजू देसले आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनसेला सामावून घेण्यास तयार नसताना स्थानिक पातळीवर घेतल्या गेलेल्या निर्णयाचे सर्वांनी समर्थन केले. भाजपला हद्दपार करण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशाबद्दल वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु, स्थानिक पातळीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आम्ही एकत्रित आल्याचा दावा संबंधितांनी केला. नगर परिषद, नगर पंंचायतींसह जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढल्या जातील, असे त्यांनी सूचित केले. प्रमुख नेत्यांकडून निर्णय घेण्यात कालापव्यय आणि काही विरोधी मतप्रदर्शित करीत असताना नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम निर्णय घेत सर्वांना एकप्रकारे धक्का दिला.
