नाशिक – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने शहराच्या जाहीर केलेल्या नव्या भव्य कार्यकारिणीत विद्यमान व माजी आमदार, प्रभावशाली नेते व माजी नगरसेवकांचे कुटुंबिय, नातलगांना स्थान मिळून घराणेशाहीची परंपरा जपली गेल्याचे आरोप सुरू झाले आहेत. ज्यांनी खरोखर काम केले, त्यांना न्याय मिळाला नाही. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलले गेले, असा सूर उमटत आहे. पक्षांतर्गत असंतोष उफाळून आल्यामुळे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यावर नाराजांची मनधरणी करण्याची वेळ आली.
भाजपने नाशिक महानगरची सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार शहराध्यक्षपदी सुनील केदार, उपाध्यक्षपदी सुनील फरांदे, ॲड. अजिंक्य साने, दिगंबर धुमाळ, रवी पाटील, धनंजय माने, सोनाली कुलकर्णी, रोहिणी दळवी, दीपक सानप, चित्रेश वस्पटे व संदीप लेनकर यांना संधी देण्यात आली. संघटनेत सरचिटणीस पद महत्वाचे मानले जाते. त्यासाठी अनेक जण इच्छुक होते. त्यावर सुनील देसाई, अमित घुगे, ॲड.श्याम बडोदे, व रश्मी हिरे-बेंडाळे यांची वर्णी लागली. चिटणीसपदी राजेश आढाव, संतोष भोर, सोनाली दाबक यांच्यासह १० जणांची तर कोषाध्यक्षपदी निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांची नियुक्ती झाली. युवा मोर्चाचे प्रमुख म्हणून प्रवीण भाटे, महिला मोर्चा स्वाती भामरे, अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रमुखपदी राकेश दोंदे यांची नियुक्ती झाली आहे.
नव्या कार्यकारिणीत सामाजिक समतोल राखत सर्वसमावेशक पदे दिल्याचा दावा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला. सर्व घटकांचा समावेश करून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकारिणीत आ. सीमा हिरे यांची मुलगी, आ. देवयानी फरादे यांचे दीर, ज्ये्ष्ठ नेते विजय साने यांचा मुलगा, माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पुतण्या अशा अनेकांना स्थान मिळाल्याकडे नाराजांकडून लक्ष वेधले जात आहे.
३५ आघाडी, सेल नव्याने सक्रिय
निवडणूक लक्षात घेत पक्षाने जवळपास ३५ विविध आघाडी, सेल व प्रकोष्ठ यावर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. समाजातील कुठलाही घटक दुर्लक्षित राहणार नाही याची दक्षता घेत त्यांची रचना झाल्याचे दिसून येते.
असंतोष उफाळला…
कार्यकारिणी जाहीर होताच पक्षांतर्गत वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. नव्याने संधी मिळणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर महत्वाची पदे न मिळाल्याने काही जणांमध्ये नाराजी आहे. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून कार्यकारिणी सदस्यांमध्ये समाविष्ट झाल्याची वेगळी खदखद आहे. आमदार व प्रभावशाली माजी नगरसेवक अशा व्यक्तींच्या घरात पदाचे वाटप झाल्याकडे काही जण लक्ष वेधतात. ज्यांनी काम केले, त्यांना न्याय मिळाला नाही. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर काहींनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्यामुळे शहराध्यक्ष सुनील केदार यांना संबधितांची नाराजी दूर करण्यासाठी धडपड करावी लागली. ज्यांना पदे मिळाली नाहीत, त्यांचा प्रदेश, केंद्रीय संघटनात्मक पदे व शासकीय समित्यांमध्ये प्राधान्याने विचार केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.