नाशिक : जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना जिल्ह्यातील चारपैकी एकही मंत्री बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही. सायंकाळी उशिरा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे येवल्यात दाखल झाले. गुरुवारी ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री ॲड. माणिक कोकाटे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी १४ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदी घेतली नसल्याचे दिसून आले.
दोन दिवसांतील पावसात मालेगाव, नांदगाव आणि सुरगाणा तालुक्यात सुमारे १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांचा आकडा २० हजारहून अधिक आहे. येवला तालुक्यातही नुकसान झाले. तेथील आकडेवारी समोर आलेली नाही. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ६५ गावांतील १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. कापूस, मका आणि कांदा पिकाला सर्वाधिक फटका बसला. आधीच उन्हाळ कांद्याला भाव नसल्याने उत्पादक अडचणीत आहे. त्यातच पावसाने शेतकऱ्यांना नवीन तडाखा दिला. संकटांच्या मालिकेने ग्रामीण अर्थकारण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात चार मंत्रिपदे लाभूनही कुणी नुकसानीची दखल घेतली नसल्याची भावना शेतकरी वर्गातून उमटत आहे.
मंगळवारी मुंबईत मंत्रिमंडळाची पार पडली. या बैठकीसाठी छगन भुजबळ, दादा भुसे, ॲड. माणिक कोकाटे व नरहरी झिरवळ हे सर्व मंत्री आदल्या दिवशीच मुंबईकडे मार्गस्थ झाले होते. शेतीचे नुकसान होऊनही बुधवारी कुणी मंत्री जिल्ह्यात वा मतदारसंघात फिरकला नसल्याचे पहायला मिळाले. बुधवारी कुणीही मंत्र्याने नुकसानीची पाहणी केली नाही. त्यास कृषी विभागाकडून दुजोरा दिला गेला. या दिवशी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ॲड. माणिक कोकाटे व नरहरी झिरवळ हे दोन्ही मंत्री मुंबईत असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. परंतु, तेही या दिवशी मालेगाव वा जिल्ह्यात नसल्याची माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे बुधवारी मुंबईकडून थेट नाशिकमधील येवला या आपल्या मतदारसंघाकडे मार्गस्थ झाले. गुरुवारी ते मतदारसंघातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार असल्याचे भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
राज्यातील अनेक भागात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्र्यांसह अनेक मंत्री विविध भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी करीत आहेत. या स्थितीत नाशिकमधील मंत्री गेले कुठे, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.