नाशिक :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या विविध योजना जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मित्रपक्ष काम करत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने गुरूवारी सकाळी राष्ट्रवादी भवन परिसरात सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ शेकडो महिलांनी मानवी साखळी केली. महिला सक्षमीकरणाचा गुलाबी रंग मानवी साखळीला होता.
राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण, सौरपंप यांसह वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात येत आहेत. या योजनांच्या प्रचारार्थ सर्जनशिलता व आधुनिक कल्पना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला मैदानात उतरल्या आहेत.
हे ही वाचा… नाशिक : बंधाऱ्यात एकाचा तर, विहिरीत दोघांचे मृतदेह
तालुकावार भिंत स्वाक्षरी मोहीम, राष्ट्रवादी मदतवाहिनी आणि मानवी साखळी असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. मानवी साखळीवेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष योगिता आहेर, सायरा शेख, योगिता पाटील, अपर्णा देशमुख, सुरेखा नागरे, राजश्री पहिलवान आदी उपस्थित होत्या. मुंबईनाका ते द्वारका या रस्त्यावर मानवी साखळी धरण्यात आली. महिलांनी गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. गुलाबी रंगाचे फलक हातात होते. फलकांव्दारे प्रामुख्याने अजित पवार यांचे गुणगान गाण्यात आले. “दादाचा वादा, काम करत आलो, काम करत राहू” हे गीत ऐकविण्यात आले.
हे ही वाचा…मालेगावात ठाकरे गटाला धक्का, माजी तालुकाप्रमुखाचा पक्षत्याग
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दोन दिवस राष्ट्रवादी तालुकावार स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.