नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बंधाऱ्यात एकाचा तर, विहिरींमध्ये दोन जणांचे मृतदेह आढळले. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
इगतपुरी तालुक्यातील आधारवड परिसरातील कैलास बऱ्हे (४५) हे दारुच्या नशेत असताना गावातील बंधाऱ्यात पडले. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह मिळाला. घोटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली. दुसरी घटना निफाड तालुक्यात घडली. राहुल मेमान (२२, रा. देवगाव) हा काही दिवसांपासून बेपत्ता होता.
हे ही वाचा…मालेगावात ठाकरे गटाला धक्का, माजी तालुकाप्रमुखाचा पक्षत्याग
नातेवाईकांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. दगु मेमाने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत राहुलचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना चांदवड तालुक्यातील आहे. ४० ते ४५ वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचे प्रेत राहुड शिवारातील शनिमंदिराच्या पाठीमागील विहिरीत आढळले. नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.