RSS Ideology / Sangh Shatabdi / नाशिक – वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांनी जबरदस्तीने हात धरून संघाच्या शाखेत नेले. नंतर स्वत:ला उत्साह येत गेला. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही संघाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. समाजात वेगवेगळ्या विचारधारा असतात. कधी कधी त्या पटतात. परंतु, त्यातील फोलपणा लक्षात आला की आपण बरोबर आहोत हे समजते. संघाच्या विचारांमुळे आजही मी या विचारधारेला समर्पित काम करीत असल्याचा अभिमान आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ मोगल संघ आणि आपले नाते मांडताना रमून जातात. मूळ बेळगाव परिसरातील परंतु, कामानिमित्त नाशिकला स्थायिक झालेले राजाभाऊ मोगल यांचे वडील आधी कॉग्रेसच्या विचारधारेनुसार काम करणारे होते. १९४२ चा स्वातंत्र्य लढा झाल्यानंतर ते संघाच्या विचारांनी प्रभावित झाले. तेव्हापासून संघ विचारांची कास धरली ती आजतागायत. वय वर्षे पाच असतांना काहीही समजत नसतांना वडील शाखेत घेऊन गेल्याचे राजाभाऊ सांगतात.
तेव्हांपासून संघाने ना त्यांचा हात सोडला ना त्यांनी संघाचा. वय वाढत होते, त्याप्रमाणे वेगवेगळ्या विचारधारा पुढे येत गेल्या. असे वेगळे विचारही आवडायचे असे म्हणण्यापेक्षा तेही बरोबर असे काही वाटत असे. त्यांच्या नेत्यांच्या मागण्या पाहिल्यावर त्यातील फाेलपणा लक्षात येत गेला. तशी संघाशी जोडलेली नाळ अधिकच घट्ट होत गेली.
विशेष म्हणजे संघ विचारांचे संचित तिसऱ्या पिढीपर्यंत मी रुजवले, याचा आनंद वाटतो. ७९ वर्षाच्या प्रवासात संघाने दिलेल्या जबाबदाऱ्या मनापासुन पूर्ण केल्या. या काळात केलेले प्रत्येक काम हे अविस्मरणीय अनुभव देणारे ठरले. संघाचे सर्व संघचालक तसेच पदाधिकारी हे एकमेकांच्या कायम संपर्कात असतात. डॉ. हेडगेवार सोडले तर सर्व सरसंघचालक हे आपणास राजा नावाने ओळखतात, असे राजाभाऊंनी सांगितले.
काही सरसंघचालकांनी राजाभाऊंच्या घरी मुक्कामही केला आहे. संघाच्या कार्याविषयी राजाभाऊ भरभरून बोलतात. शिबीर, मदतकार्य एखादा नवा उपक्रम, सारं काही महत्वाचे होते. माझा मुलगा पुष्कराज हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून नायजेरियात २० वर्षांहून अधिक काळापासून काम करीत आहे. त्या ठिकाणी काम करतांना त्याने संघाच्या सात शाखा सुरू केल्या. त्या शाखांनी एकत्र येत जात, धर्म, पंथ विसरत एक कार्यक्रम घेतला. तो यशस्वी केला.
कार्यक्रमानंतर सर्वजण जेवणासाठी खाली बसले. विविधतेत एकता ही हिंदू संस्कृती आपण टिकवून आहोत, ही शिकवण नातवंडांपर्यंतही पोहचली आहे. दुसरा मुलगा समृध्द हा संघाच्या संपर्क विभागाची जबाबदारी सांभाळतो. याशिवाय त्याचे नियमित कामही सुरू असते. ही सर्व मंडळी उच्चशिक्षित. पण सर्व विचार करून संघात आलेली आहेत.
माझ्या आजोळी सर्वजण काँग्रेसच्या विचारांचे आहेत. यामुळे बऱ्याचदा त्यांच्याशी वाद व्हायचे. पण वाद-विवाद, मत-मतान्तर असतन्च. मात्र त्यांना आता हे विचार पटू लागले आहेत. इतके की संघाच्या संचलनात त्यांनी संघाचा गणवेश परिधान करत संचलन केले. मागील वर्षीही मी संचलनात गणवेश परिधान करत सहभागी झालो होतो. यंदाही हा सहभाग असणार आहे.
संघाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वदूर पोहचवत आहेत. आपण कोणाचा हक्क मारत नाही. धर्म बदला, असे सांगत नाही. ही शिकवण आज वैश्विक पातळीवर पोहचत असल्याने पंतप्रधान मोदी यांच्यामुळे जगातील अनेक देश आपले मित्र झाले आहेत. आज ही संघटना शताब्दी वर्षात पदार्पण करत असल्याचा अभिमान आहे, असे राजाभाऊ मोगल यांनी सांगितले.