नाशिक : महाराष्ट्रातील शेतकरी अस्वस्थ आहे. संकटातून मार्ग काढणे ही राज्य आणि केंद्राची जबाबदारी असते. शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, कांद्यासह सोयाबीन, कापूस सर्वच शेतीमालास अल्प भाव मिळत आहे. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे दुखणे समजत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शरद पवार हे खुल्या वाहनातून सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषिविरोधी धोरणास लक्ष्य केले. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी गांभीर्य नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. मात्र जबाबदारी घेण्यास राज्यकर्ते तयार नाहीत. दोन महिन्यात दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकरी एवढी टोकाची भूमिका घेण्याचे कारण म्हणजे संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्रात कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्येसंदर्भात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करुन शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी मिळवून दिली होती, असे उदाहरण दिले. पुढील दीड महिन्यात सरकारने कर्जमाफी जाहीर न केल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला.
देवाभाऊ, धडा घ्या…
देवाभाऊ, संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही जाहिरातींमधून शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले. शिवाजी महाराज बळीराजा उपाशी राहता कामा नये, याकडे विशेष लक्ष देत. तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल न घेतल्यास अधिक उग्र मोर्चा निघेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला. (राष्ट्रवादीच्या (शरद पवार) आक्रोश मोर्चात खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. रोहित पवार, खा. भास्कर भगरे, माजी मंत्री राजेश टोपे आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. (छायाचित्र- यतीश भानू))
