Sharad Pawar on India Pakistan Match – दुबई येथे रविवारी रात्री आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येत असल्याने या लढतीचे वेगळे महत्व आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असे नमूद करत पाकिस्तानबरोबरचा पाणी करार रद्द केल्याची घोषणा केली होती. परंतु, आता पाकिस्तानविरुध्द भारत क्रिकेट खेळण्यास कसा तयार झाला, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच भारत-पाकिस्तान लढत सुरु होण्याआधीच मैदानाबाहेर राजकीय आणि भावनिक लढत सुरु झाली आहे.

आम आदमी पक्ष आणि शिवसेनेने (उध्दव ठाकरे) यांनी जाहीरपणे पाकिस्तानविरुध्द भारताने क्रिकेट खेळू नये, अशी भूमिका मांडली आहे. आशिया चषकातील सामना अजूनही भारताने रद्द करावा, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, या घोषणेचे आता काय झाले, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी कुंकू (सिंदूर) पाठविण्याचे आंदोलनही केले. काही माजी क्रिकेटपटूंनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, जगाच्या पाठीवर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कुठेही सामना राहिला तरी त्याची घोषणा होताच अल्पावधीत सामन्याची सर्व तिकिटे विकली जातात. परंतु, दुबईतील सामन्याची तिकिटे अजूनही शिल्लक असल्याचे म्हटले जाते. नाराज क्रिकेटप्रेमींनी या सामन्याकडे पाठ फिरविल्याचे म्हटले जात आहे.

या पार्श्वभूमिवर, क्रिकेटचे जाणकार आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिक येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने नाशिक येथे पंचवटीतील स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे रविवारी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे.

शिबिराच्या प्रारंभी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने भारत-पाकिस्तान सामन्यास विरोधासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.. यासंदर्भात शरद पवार यांनी, भारत-पाकिस्तान सामना हा काही फार मोठा विषय नाही. तो एका दिवसाचा प्रश्न आहे, असे उत्तर दिले. शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पाकिस्तानविरुध्द क्रिकेट खेळणे चुकीचे असल्याची सांगितले. पहलगाम हल्ल्याचा विचार करता पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे चुकीचे आहे. ‘खून और पाणी सात मे नही बहेंगा’ असे भाजपचे नेते सांगत होते. आता त्यांची भूमिका बदलली आहे. भाजप महिन्याला धोरण बदलत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.