नवी मुंबई : मुलुंड-ऐरोली मार्गावर १३ सप्टेंबरला घडलेल्या किरकोळ अपघातानंतर सिमेंट मिस्कर चालकाच्या अपहरण प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. बेलापूर न्यायालयाने वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केल्याने, मनोरमा खेडकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, पूजा खेडकर यांचे वडील आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक दिलीप खेडकर अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांच्या शोध घेणे सुरू आहे.

१३ सप्टेंबर रोजी मुलुंड-ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर वाहन आणि फॉर्च्युनर कार यांच्यात किरकोळ अपघात झाला होता. या अपघातानंतर मिक्सर चालक प्रल्हादकुमार चौहान याच्याकडे नुकसानभरपाई मागितली असता, त्याने नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. या वादातून दिलीप खेडकर आणि चालक प्रफुल्ल साळुंखे यांनी ट्रक चालकाला त्यांच्या गाडीत बसवून आपल्या पुणे जिल्ह्यातील औंध येथील एका बंगल्यात बंदिस्त ठेवले होते. तेव्हा नवी मुंबई पोलिसांनी तक्रारीच्या आधारे ट्रक चालकाचा शोध घेऊन त्याची सुखरूप सुटका केली. त्यानंतर आरोपी प्रफुल्ल साळुंखे याला धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

दरम्यान, पोलीस तपासात समोर आल्यानुसार मनोरमा खेडकर यांनी पोलीसांना घरात येऊ दिले नाही, उलट अंगावर कुत्रे सोडले आणि अपघातग्रस्त गाडी व बंगल्यातील छायाचित्रण यंत्राचे रेकॉर्ड लपवले. यामुळे त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगळवारी (३० सप्टेंबर) संध्याकाळी मनोरमा खेडकर या स्वतःहून नवी मुंबईच्या बेलापूर न्यायालयात हजर झाल्या होत्या. त्यावेळी मनोरमा खेडकर यांच्याकडून न्यायालयासमोर अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला. न्यायालयाने खेडकर यांचा अर्ज मान्य करत मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकर यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

परंतु, दोन प्रमुख आरोपींपैकी प्रमुख असलेले दिलीप खेडकर हे अद्याप फरार असल्याने पोलिसांपुढचे आव्हान अद्याप संपलेले नाही. दिलीप खेडकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या तीन तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिलीप खेडकर यांना ताब्यात घेतल्यावरच प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, रबाळे पोलीस या प्रकरणातील सर्व आरोपींची चौकशी सातत्याने करत आहेत.