उरण : नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणाची घटिका समीप आली असूनही नामकरणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या स्थानिक भूमीपुत्राकडून नाव देण्या बाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. तर दुसरीकडे विमानतळाला दिबांचेच नाव देणार असा दावा सत्ताधारी आमदार करीत आहेत. या दावे प्रतिदावे आणि शंका कुशंकाना सद्या नवी मुंबई तसेच उरण पनवेल मध्ये उधाण आले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून दि. बा. पाटील सर्व पक्षीय नामकरण समितीच्या माध्यमातून लढे,चर्चा, निवेदने,जनजागृती आणि आंदोलने सुरू आहेत. या दरम्यानच्या काळात केंद्रीय विमानन मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या कडून विमानतळ नामकरण यासाठी केंद्राकडे केवळ राज्य सरकार कडून आलेला एकमेव दिबांच्या नावाचा प्रस्ताव असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव केला होता. त्याला भाजपा सह काही पक्षांनी विरोध केला होता.

भाजपचे उरण व पनवेलचे आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी या सर्वपक्षीय (महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष वगळता)दिबांच्या नामकरणाची झालेल्या आंदोलनाला सर्व प्रकारची रसद पुरविली होती. मात्र याच महाविकास आघाडीचे सरकार अल्प मतात येताच बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी दिबांच्या नावाचा नवा प्रस्ताव तयार केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर दिबांच्या नावाचा प्रस्ताव हा ठाकरे सरकारने अल्पमतात असतांना केल्याचे कारण पुढे करीत. महायुती सरकारने दिबांच्या नावाचा नवा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारला पाठविला आहे. या प्रस्तावाला विमानात सुरू होण्याची तयारी सुरू असतांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आता पर्यंत मंजुरी दिलेली नाही.

तर विमानतळाच्या बोर्डिंग पास वर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विमानतळाच्या संरक्षण भिंतीवर ही एनएमआय असा उल्लेख आहे. तर दुसरीकडे पनवेल महानगरपालिके कडून विमानतळावर जाणाऱ्या मार्गाच्या दिशादर्शनासाठी लावण्यात आलेल्या फलकांवर ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नामोल्लेख करण्यात आला आहे. या सर्व घडामोडी नंतर रायगड, ठाणे,नवी मुंबई, मुंबई व पालघर या जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांनी संताप व्यक्त केला आहे.

नुकताच भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी प्रथम संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न उपस्थित करून सरकार कडे उत्तर मागीतले मात्र केंद्र सरकार कडून समर्पक उत्तर न आल्याने त्यांनी भिवंडी ते उरणच्या जासई या दिबांच्या जन्मगावा पर्यंत शेकडो वाहनांचा ताफा काढून नामकरणाचा जागर केला. यावेळी झालेल्या मेळाव्यात संभावित ३० सप्टेंबरच्या विमानतळाच्या लोकार्पणापूर्वी केंद्र सरकारने नामकरणाची २९ सप्टेंबर पर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करावी अन्यथा आंदोलनाच्या दिवशी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला भाजपच्या आमदारांनी स्टंटबाजी म्हणून हिनवले आहे. त्यानंतर या पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोध असा संघर्ष सुरू झाला आहे.

तर नवी मुंबई विमानतळाला दिबांच नाव ही येथील स्थानिक भूमीपुत्रांच्या अस्मितेची मागणी आहे. तर दिबा पाटील हे राष्ट्रीय नेते नव्हते त्यामुळे राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांच नाव देण्या विषयी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र दिबांनी विधानसभा,राज्याचे विरोधीपक्ष नेते त्याचप्रमाणे दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून काम केले आहे. या त्यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर कसेल त्याची जमीन या कुळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेला संघर्ष, राज्यात स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा,शेतकऱ्यांना जमीन संपादीत केल्यानंतर मोबदला म्हणून विकसित साडेबारा टक्के भूखंड कायदा आणि त्यानंतर २०१३ च्या भूसंपादन आणि पुनर्वसन कायद्यात २० टक्के विकसित भूखंडाची तरतूद,ओबीसीच्या मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात पहिलं आंदोलन दिबांनी सुरू केलं आशा राष्ट्रीय पातळीवरील कार्याचा आलेख दिबांच्या नावी आहे. त्यामुळे दिबा हे राष्ट्रीय नेते आहेत असा दावा आता पुढे केला जात आहे.