पनवेल – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाची अधिकृतपणे घोषणा केंद्र सरकारने केली नाही. परंतू प्रकल्पग्रस्तांनी दैवत मानलेल्या दि. बा. पाटील यांच्या विमानतळ नामफलकाला झाकण्याची युक्त्या लढविल्या जात आहेत. उदघाटनापूर्वीच करंजाडे वसाहतीकडून विमातळाकडे जाणा-या मार्गिकेवर दि. बा. पाटील यांच्या नावाच्या विमानतळ मार्गिका दर्शविणा-या फलकाशेजारील मार्गच गडद हिरव्या पडद्याने झाकल्याने उदघाटनापूर्वी दि. बांचे नाव झाकण्याच्या मागे कोण कारस्थानी आहे याचीच जोरदार चर्चा प्रकल्पग्रस्तांमध्ये सुरू आहे.  

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचण्यासाठी पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक उभारले आहेत. या फलकांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख होता. प्रकल्पग्रस्तांनी याच फलकांवर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मजकूर लिहीलेला फलक चिकटविल्यामुळे अनेक फलकांवर दि. बांच्या नावाचा उल्लेख ठळकपणे दिसतो. 

अद्याप विमानतळाचे उदघाटन न झाल्याने केंद्र सरकारने विमानतळाच्या नामकरणावर निर्णय जाहीर केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या उदघाटनावेळी विमानतळाच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यांच्या नावाचा फलक लावून हेच नाव राहणार यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दरम्यान करंजाडे येथील विमानतळ मार्गाकडे जाणा-या मार्गावरील दि. बा. पाटील यांचा एक फलक झाकण्यासाठी थेट हिरव्या पडद्याचा आधार घेतल्याने हा दि.बांच्या नावावर विमानतळाचा पडदा अशी चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे विमानतळ प्रकल्पाचे अंतिम टप्यातील काम पुर्ण करून उदघाटनापूर्वी विविध हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केल्या जातआहेत. यामध्ये विमानतळाच्या अंतर्गत स्वच्छता व सजावटीचे काम तसेच विविध विजेवरील उपकरणाची चाचणी केली जात आहे. विमानतळ सूरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सूरक्षा बलाचे जवान टप्याटप्याने या विमानतळाच्या सूरक्षेचे हस्तांतरण करत आहेत.

विमानतळाच्या उद्घाटनानंतर प्रत्यक्षात प्रवासी आणि लॉजिस्टिक विमान उड्डाणासाठी अजून एक ते दिड महिना लागणार असल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या आर्थिक चलनाला गती देणा-या या प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांच्या नेत्याचेच नाव दिले पाहीजे ही मागणी गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी जोरदार लावून धरली आहे. यामुळे येथील सर्व प्रकल्पग्रस्तांकडून विमानतळात नोकर मिळण्याच्या मागणीपेक्षा विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी येथील तरूण झटताना दिसत आहेत. 

रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका आणि जिव्हाळ्याच्या या विषयावर राज्य सरकारने सुद्धा पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारकडे मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. या विमानतळाला अन्य कोणते नाव द्यावे यासाठी राज्य सरकारने इतर कोणत्याही नावाची शिफारस केली नाही. त्यामुळे विमानतळ उदघाटनाला पंतप्रधान मोदी हेच दि.बांच्या नावाची घोषणा करतील अशी चर्चा असताना करंजाडे वसाहतीकडून विमानतळ मार्गाने उलव्याकडे जाणा-या मार्गावरील दि. बा. पाटील यांच्या नावाचा फलकावर पडदा टाकल्याने अशा पद्धतीने इतर दि. बा. पाटील नावांचे फलक झाकले जातील अशी भिती प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाकडे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या प्रवक्त्यांशी सुद्धा संपर्क साधला मात्र त्यांची सुद्धा प्रतिक्रिया मिळू शकली नाही.