नवी मुंबई : स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘एक स्थानक-एक उत्पादन’ योजना सुरू केली. मात्र, नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सना आजतागायत वीज पुरवठा न मिळाल्याने या योजनेला घरघर लागली आहे. ऐन दिवाळीत ही योजना अक्षरशः अंधारात गेल्याने कमाईच्या हंगामातच व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.

या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, सानपाडा, बेलापूर, खारघर, कोपरखैरणे, तुर्भे, ऐरोली, घणसोली आणि पनवेल या स्थानकांवर हे स्टॉल उभारण्यात आले आहेत. अनेक स्टॉल्सवर कपडे, दागिने, शोभेच्या वस्तू यांसह विविध स्थानिक उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली आहेत. मात्र, वीजजोडणी न मिळाल्याने संध्याकाळच्या वेळी स्टॉल्स अंधारातच असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यात स्टॉलधारक कमी पडत आहेत. त्यामुळे उत्पादनांच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे.

दिवाळीसारख्या सणात चांगला नफा होईल या आशेने रेल्वे स्थानकात हा स्टॉल घेतला होता, मात्र वीजजोडणी नसल्याने रात्रीच्या अंधारात काहीच विक्री होत नाही. महिन्याभराचे भाडे सिडकोला दिले आहे; परंतु रेल्वे स्थानकात वीज असली तरी स्टॉलमध्ये वीज नसल्याने व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होतो आहे, अशी व्यथा एका विक्रेत्याने मांडली आहे.

व्यवसाय कसा चालवायचा?

विक्रेत्यांना महिन्याच्या करारावर स्टॉल दिले जात असून, भाडे नियमितपणे भरावे लागते. पण विजेसारखी मूलभूत सुविधा न मिळाल्याने व्यवसाय कसा चालवायचा, असा प्रश्न सर्व विक्रेत्यांसमोर उभा आहे. अनेकांनी चार्जिंग बल्ब किंवा ट्यूब लावून स्टॉलवर कसाबसा उजेड केला आहे; परंतु तो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसा नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. रेल्वेकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर स्टॉलधारकांना वीजपुरवठा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील स्टॉलधारकांनाही वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. वीज बिल भरण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे

सिडको-रेल्वे समन्वयाचा अभाव

नवी मुंबईतील हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील रेल्वे स्थानके अद्याप सिडकोच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे इथली सर्व व्यवस्था सिडको पाहते. ही स्थानके मध्य रेल्वेला औपचारिकरीत्या हस्तांतरित न झाल्याने मध्य रेल्वे प्रशासन आणि सिडको यांच्यात नेहमीच समन्वयाच्या अभाव जाणवतो. याचा फटका या स्टॉलधारकांना बसतो आहे. केंद्राने सुरू केलेली ही योजना स्थानिक उत्पादक, महिला बचत गट आणि शेतकरी गटांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरली असती. मात्र वीजजोडणीअभावी अनेक स्टॉल बंद पडले आहेत. त्यामुळे केंद्राची स्थानिक उत्पादन आणि उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना नवी मुंबईत मात्र कागदावरच राहिल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

संबंधित विभागातील अभियंत्यांशी बोलून परिस्थितीची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. -प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको