ठाणे – पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याकडे नवी मुंबईकरांचा कल असल्याचे दिसून आले. तसेच यंदा नवी मुंबईत गणेशोत्सवातील १० दिवसांमध्ये विसर्जना दरम्यान एकूण ६३.६९५ टन निर्माल्य जमा करण्यात आले. हे निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे. या निर्माल्यातून तयार होणाऱ्या खतांचा वापर उद्यानांसाठी केला जाणार आहे.
यंदा संपुर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी मुंबईकर नागरिकांनी देखील आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आवाहनानुसार ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यावर भर दिला. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नागरिकांनी ६ फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेशमूर्तींचे १४३ कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करुन पर्यावरणाच्या संरक्षण, संवर्धनासाठी योगदान दिले. त्याचप्रमाणे गणेशमूर्तीसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले आणि सुके अशा वेगवेगळ्या निर्माल्य कलशात टाकण्यात आले.
गणेशोत्सवातील विसर्जनाच्या कालावधीत २२ नैसर्गिक आणि १४३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात ६३ टन ६९५ किलो इतके निर्माल्य जमा झाले. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांनी स्वच्छताकर्मींसह नियोजनबध्द रितीने ही निर्माल्य संकलन मोहीम राबविली. याशिवाय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडायांच्या वतीने धारण तलाव, कोपरखैरणे याठिकाणच्या स्थळावरील तसेच कोपरी आणि महापेगाव तलाव येथील फुलांच्या पाकळ्यांचे निर्माल्य जमा करून या निर्माल्यापासून खतनिर्मितीची कार्यवाही करण्यात येत आहे.
गणेशोत्सवात गणेशमुर्तीसोबत विसर्जनस्थळी येणाऱ्या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य’ तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य’ नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जमा करण्यात आले.
गणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसांच्या विसर्जनादिनी १४.२०५ टन निर्माल्य, पाचव्या दिवाशी १०.९८० टन, गौरींसह सातव्या दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी २४.४४० टन आणि अनंतचतुर्दशीदिनी दहाव्या दिवसाच्या विसर्जनप्रसंगी १४.०७० टन निर्माल्य संकलित करण्यात आले. अशाप्रकारे यंदाच्या गणेशोत्सव कालावधीत एकूण ६३ टन ६९५ किलो इतके निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे. या खतांचा वापर उद्यानांसाठी केला जाणार आहे.