वाडा : महाराष्ट्राला येत्या १० वर्षात तीन- तीन वेळा मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री लाभून देखील “भिवंडी -वाडा – मनोर महामार्गाची दुरवस्था मात्र कायम राहिली आहे. त्यामुळे वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेला ठाणे, मुंबई येथे जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे नागरिकांचे, प्रवाशांचे मोठे हाल होवून दिवसभराचा खोळंबा सहन करण्याची वेळ ओढवली आहे.
त्यामुळे वाडा, विक्रमगड तालुक्यासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांची झालेली दुर्दशा व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांचा अन्याय आता सहन केल्या जाणार नाहीत असा निर्धार करून सर्वपक्षीय नेत्यांनी वज्रमूठ बांधली आहे. गणपती सणापर्यंत रस्ते सुस्थितीत करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा सामना करण्यासाठी तयार रहा असा इशारा जव्हार येथील पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबार कार्यक्रमात निवेदन सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून भूमिका स्पष्ट केली आहे.
वाडा तालुक्याला तीन आमदार व दोन खासदार लाभून देखील ते या भागातील जनतेला चांगल्या दळणवळणाच्या, अन्य सोयी उपलब्ध करून देवू शकत नाही ही शोकांतिकाच आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार होत नाही. विधानसभेत आवाज उठवला जात नाही असा संघर्ष समितीचा आरोप असून याविरोधात “सर्वपक्षीय रस्ते संघर्ष समितीची स्थापना” करून लढा उभारला जाईल यासाठीची तयारी सुरू केली आहे. असे वाडा येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
वाडा – भिवंडी महामार्ग मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दिल्ली, हरियाणा, गुजरात यांसह परराज्यातून येणारी अवजड वाहने मुंबई – अहमदाबाद, मुंबई- नाशिक महामार्गावरून ठाणे, मुंबई, नाशिककडे जात असल्याने अवजड वाहतुकीने मोठ्या प्रमाणावर कोंडीने जनता त्रासली आहे. त्यातच अंतर्गत मार्गांची अवस्था बिकट असून नोकरदार, प्रवाशी, विद्यार्थी हैराण आले आहेत.
“भिवंडी – वाडा – मनोर” या ६४ किमी महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचा ठेका “ईगल इन्फ्रास्ट्रक्चर” कंपनीला ७७६ कोटींना देण्यात आला आहे. हे काम सुरू असतानाच “ईगल इन्फ्रास्ट्रक्चर” या कंत्राटदाराने पूर्वीचा रस्ता सुस्थितीत आवश्यक होते. तशी निविदामध्ये तरतूद असताना मात्र ते केले नाही. त्यामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आता काँक्रिटीकरणाचे साधारण आठ (८) किमी इतकेच काम केले आहे. आता रस्त्याच्या कामासाठी निधी मिळत नाही अशी ओरड करून काम बंद ठेवले आहे. निधी मिळत नव्हता तर मग पुढे सर्व रस्त्याची खोदाई का केली.? असा सवाल उपस्थित करत कंत्राटदाराची काम करण्याची पात्रता (कपॅसिटी) नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे काम अन्य ठेकेदाराला देण्यात यावे असे प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.
वाडा, विक्रमगड तालुक्यातील विविध नागरी समस्यांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना एकत्र आले असून येत्या काळात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे. राजकीय पक्ष व विविध संघटनांची आंदोलने बदनाम झाल्याने सामान्य जनतेचा आंदोलनांवरून विश्वास उडाला आहे, असे मान्य करून गावागावांत जाऊन जनआंदोलन उभे करू असे संयोजक विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.
महामार्ग व अंतर्गत रस्त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून यात अधिकारी वर्गांसह मंत्रीही सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीच्या वेळी घराघरात फिरणारे सत्ताधारी पक्ष मात्र जनता समस्यांचे चटके सहन करीत असताना संघर्ष समितीपासून लांब असल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त करून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे . वाढवण बंदर साठी घाट घातला जात आहे. मात्र यामुळे पालघर जिल्ह्यातील मोठया प्रमाणावर उत्खनन होत असल्याने दरी, डोंगर, शिल्लकच राहणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असुन पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे.
वाडा, विक्रमगड तालुक्यातून उच्च दाब वाहिन्या जात आहेत व पुढेही जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी पुर्णतः उध्वस्त होणार आहे. राज्यात सध्या दडपशाही सुरू असल्याने नोकरशाहीवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. तो जनतेने वचक ठेवला पाहिजे असा घणाघात “सर्वपक्षीय रस्ते संघर्ष समिती”चे (ठाणे व पालघर) संयोजक विश्वनाथ पाटील यांनी वाडा येथील पत्रकार परिषदेत केला. या सर्वपक्षीय आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील बैठकीला विश्वनाथ पाटील, प्रफुल पाटील, निलेश गंधे, गोविंद पाटील, कांतीकुमार ठाकरे, दीपक ठाकरे, गणेश पाटील, युवराज ठाकरे, देवेंद्र भानुशाली यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थित होते.