पालघर : मे महिन्याच्या शेवटचा आठवड्यात दमदार झालेल्या पावसाने जून महिन्यात उघडीप घेतल्याने प्रचंड उष्णाचे वातावरण तयार झाले होते. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना गुरुवारी मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने पुनरागमन केल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. या वादळी पावसामुळे अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून पडले असून वीज पुरवठा खंडित होणे तसेच शाळा व घरांची छपरे उडाल्याचे प्रकार घडले आहे.

गेले काही दिवस हवेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता असल्याने काहलीमुळे नागरिकांचा जीव कासावीस झाला होता. काल मध्यरात्रीच्या सुमारास पालघर, डहाणू तसेच विक्रमगड व जव्हार तालुक्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात किमान १०० झाडं उन्मळून पडल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत. पालघर आगारात वादळी वाऱ्यामुळे बसवर झाड पडले तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाड पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

डहाणूसह मोखाडा व जव्हार तालुक्यातील परिसरात रात्री ११ च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याने विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले असून, परिणामी संपूर्ण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या भागात ३३ केव्हीच्या महत्त्वाच्या विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने महावितरण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडित केला आहे.

संतोषी येथे एका विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने त्वरित वीजपुरवठा बंद करण्यात आला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे उशिरापर्यंत झाडे कापण्याचे काम सुरू ठेवले असले तरी संपूर्ण भाग अंधारात राहिला. या अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, उद्योजक, सीएनजी गॅस व पेट्रोल पंप यांना बसला आहे. कामकाज ठप्प झाल्याने स्थानिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १५ विद्युत खांब पडले असून यामध्ये बोईसर येथील चार उच्च विद्युत वाहिन्या व सफाळे, माहीम, उमरोळी या भागातील विद्युत खांब कोसळले आहेत. ढेकाळे येथे देखील विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचा संताप

पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने याचा फटका आता थेट नागरिकांना बसत आहे. अवघ्या दीड-दोन महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात असून, दुरुस्तीचे काम नेमके कुठे सुरू आहे आणि कितपत झाले आहे, याबाबत महावितरणकडून ठोस माहिती दिली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वादळामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना अंधारात ठेवण्याची वेळ येणे हे नियोजन शून्यतेचे लक्षण आहे, अशी टीका आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जवळपास पंधरा विद्युत खांबांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित आहे. काही ठिकाणची कामे पूर्ण झाली असून संध्याकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. – सुनील भारंबे, महावितरण अभियंता.

13 जून रोजी झालेला पाऊस

तालुका – मिलिमीटर मध्ये
वसई – २२.९
वाडा – ७.४
डहाणू – १८.१
पालघर – ३४.८
जव्हार – ०.५
मोखाडा – ०.५
तलासरी – ३३.८
विक्रमगड – १६.८
एकूण – १९.६