-
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. येत्या ७ मे रोजी तिसरा टप्पा पार पडणार आहे.
-
या दोन्ही टप्प्यांत प्रचार करताना आम्ही इंडिया आघाडीच्या पुढे २.० या फरकाने आहोत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तसंच उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना असा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या प्रचारसभेत करत आहेत. (संग्रहित फोटो)
-
काल २९ एप्रिल रोजी सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचाराची सभा घेतली.
-
या सभेत त्यांनी नकली शिवसेना या मोदींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपा म्हणजे काही ब्रह्मदेव नाही. भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व, भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपाच्या विरोधात बोलणारा देशद्रोही असं नाही. मोदींना मी सांगू इच्छितो की नकली शिवसेना जे काही आम्हाला हिणवत आहात तसं म्हणायला ती तुमची डिग्री नाही.”
-
“४ जूनला तुम्हाला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कोण असली कोण नकली? ते समजेल. आज सोलापूरचे प्रश्न आहेत, राज्याचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष कुठे आहे? प्रणितीचाच आवाज लोकसभेत पाठवायचा आहे हे विसरु नका.” असंही उद्धव ठाकरे सोलापूरच्या सभेत म्हणाले.
-
मोदींची आश्वासनं म्हणजे कोपराला गूळ लावण्याचा प्रकार
“हल्ली कुणाला मित्र म्हणायचं म्हणजे पाठ सांभाळावी लागते. कारण हल्लीचे मित्र हे पाठीवर वार करणारे आहेत. आजच तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले. शिवसेना प्रमुख त्यांना कमळाबाई म्हणायचे. कमळाबाईचे नेते नरेंद्र मोदी येऊन गेले. सध्या ते महाराष्ट्रभर आणि देशभर फिरत आहेत. लोकांच्या कोपराला गुळ लावण्याचं काम जोरात सुरु आहे. कोपराला गूळ लागला की धड चाटताही येत नाही आणि काढताही येत नाही.” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. -
मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका
“वापरा आणि फेकून द्या ही यांची नीती आहे. २०१४ मध्ये देशात पंतप्रधान झाले ऑक्टोबरमध्ये युती तोडून टाकली. त्यामागचं कारण काय होतं? २०१९ मध्येही पंतप्रधानपदी बसले तेव्हाही अमित शाह यांना वचन सांगितलं होतं. मी माझ्या वडिलांना म्हणजेच बाळासाहेबांना शब्द दिला आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार. त्यांनी मला वचन दिलं होतं. मात्र नंतर अमित शाह यांनी शब्द मोडला. अशा प्रकारे वापरा आणि फेका ही भाजपाची नीती आहे.” असं म्हणत मोदी आणि अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. -
मशालीच्या धगीने कमळ कोमेजणार
“कालपर्यंत आमचं प्रेम अनुभवलं आता मशालीची धग काय ते बघा. मशालीच्या धगीमध्ये तुमचं कमळ कसं कोमेजतं ते बघा. तुम्ही कोण आम्हाला प्रमाणपत्र देणारे? शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुम्ही कुठेतरी हिमालयात किंवा कुठेतरी रेल्वे स्टेशनवर असाल. शिवसेनाप्रमुखांनी कठीण काळात तुम्हाला सांभाळलं. अटलजींनी केराच्या टोपलीत गेला असतात तर दहा वर्षे भोगायला मिळाली नसती. ४८ पैकी ४२ खासदार दिले होते. शिवसेना बरोबर होती त्यामुळे त्या तख्तावर बसला होतात आता त्या तख्तापर्यंत आम्ही तुम्हाला पोहचू देणार नाही.” असंही ठाकरे म्हणाले. -
(सर्व फोटो साभार- शिवसेना, फेसबुक पेज)
Lok Sabha Election 2024 : सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण; ‘नकली शिवसेना’ विधानावरुन मोदी-शाहांना दिलं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंनी नकली शिवसेना या मोदींच्या वक्तव्यावर त्यांना उत्तर दिलं आहे.
Web Title: Uddhav thackeray held a campaign meeting for congress candidate praniti shinde in solapur spl