अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्याकडून दरवर्षी दिवाळी सणादरम्यान किराणा वाटप केले जाते. यंदा २ लाख कुटुंबाना किराणा वितरीत करण्यात आल्याचा दावा राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून करण्यात आला, पण यावेळी राणा दाम्पत्याने आगळीक केली.

काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी किराण्याची पिशवी पोहचविण्यात आली. ही राजकीय खोडी चांगलीच गाजली. यशोमती ठाकूर यांनी या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. राणा दाम्पत्याने आपल्या ‘औकाती’त रहावे, असा थेट इशाराच यशोमती ठाकूर यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवण्याची ही खेळी कोणत्या वळणावर पोहचेल, याची उत्सुकता आहे.

दोन आठवड्यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अमरावतीत पार पडली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते किराणा वाटपाच्या शुभारंभाचा मुहूर्त साधला. साखर, डाळ, तेल यासारखे जिन्नस असलेली पिवशी घरोघरी पोहचवली जाते. अनेक ठिकाणी स्वत: नवनीत राणा, रवी राणा जातात. किराणा वाटपाचा हा एक सोहळा असतो. त्याची चर्चा अमरावतीच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

विरोधक या किराणा वाटपावर टीकाही करतात. पण, राणा दाम्पत्य त्याची तमा बाळगत नाहीत. विरोधकांनी आपले हात खुले करून दाखवावे, असे आव्हान ते देतात. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किराणा वाटपाचा शुभारंभ होऊनही त्याची फारशी चर्चा झाली नव्हती. पण, एक दिवस यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी राणा यांचा दिवाळी किराणा पोहचला आणि ठाकूर यांच्या संतापाचा भडका उडाला. राणा दांपत्याने आपली राजकीय नाटकबाजी थांबवावी, अन्यथा लोकच त्यांना योग्य जागा दाखवतील, असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे.

यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांचे राजकीय वैर जुने आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडणूक लढल्या, तेव्हाच यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्या राजकीय वाटचालीविषयी साशंकता व्यक्त केली होती. ती खरी ठरली आणि नवनीत राणा यांनी विजयी होताच भाजपला पाठिंबा दिला. तेव्हापासून राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्या गटात संघर्ष आहे. यापूर्वीही अनेकवेळा आरोप प्रत्यारोप गाजले आहेत. पण, आता किराणा वाटपाची राजकीय खोडी ही बराच काळ चर्चेत राहणार आहे.

यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. नवनीत राणा पराभूत झाल्या. हा पराभव राणा दाम्पत्याच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर या पराभूत झाल्या. आम्ही त्यांना पराभूत केले, असा दावा राणा दाम्पत्याकडून करण्यात आला.

राजकीय सूडचक्राची ही सुरूवात ठरली. नवनीत राणा या पराभूत झाल्याने त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाची संधी हुकली, अशी खंत राणा दाम्पत्य हे अनेक सभा, मेळाव्यांमधून व्यक्त करीत असतात.

यशोमती ठाकूर या आक्रमक नेत्या आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा त्यांच्याकडे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष कामाला लागलेला असताना राणा दाम्पत्याच्या एका कृतीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.