परभणी : जिल्ह्यात सर्वाधिक रंगतदार लढत होत असलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारांचे परस्परांवर टीकास्त्र सुरू असले तरी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता बाबाजानी आणि आमदार सुरेश वरपुडकर यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. बाबाजानी यांना बंडखोरीची नेहमी सवय आहे असे वरपुडकर म्हणाल्यानंतर वरपुडकरच्याही बंडखोरीच्या इतिहासाला बाबाजानी समर्थकांनी उजाळा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाथरीत महाविकास आघाडीच्या वतीने आमदार सुरेश वरपूडकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी केली आहे तर महायुतीच्या वतीने राजेश विटेकर हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या सईद खान यांनी बंडखोरी केली आहे. माजी आमदार मोहन फड यांचे वडील माधवराव हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात रंगतदार लढत पाथरी मतदारसंघात होऊ घातली आहे. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी बंडखोरी झाली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, राजू पाटील एकीने शिंदे यांच्या गोटात चुळबूळ

बाबाजानी दुर्राणी यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी वरपुडकरांनी जोरदार प्रयत्न केले होते तथापि बाबाजानी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. यानिमित्ताने वरपुडकरांनी बाबाजानी यांच्यावर टीका केली आहे. ज्या- ज्या वेळेस काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळते त्या- त्या वेळेला बाबाजानी बंडखोरी करीत असतात. २०१४ मध्ये आपल्याला काँग्रेसची उमदवारी मिळाली तेव्हाही बाबाजानी यांनी दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन बंडखोरी केली होती. आताही त्यांनी माझ्या विरोधात बंडखोरी केली आहे. त्यांना बंडखोरीची सवयच आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे पाडायचे याचेच त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू असतात असेही वरपूडकर म्हणाले.

हेही वाचा – Jitendra Awhad : मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप

वरपुडकरांना बाबाजानी यांच्या गोटातून जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. बाबाजानी यांच्यावर तुम्ही बंडखोरीचे आरोप केले असले तरी उमेदवारी मिळाली नाही म्हणून ‘विमान’ या चिन्हावर २००४ च्या निवडणुकीत आपण बंडखोरी करून पक्षाचा अधिकृत उमेदवार पाडला. २०१४ ला आम्ही बंडखोरी केली म्हणता, खरे तर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री केले पण पक्षाने तिकीट दिले नाही, म्हणून बंडखोरी करत काँग्रेस प्रवेश करून निवडणूक कोणी लढवली होती ? असे प्रश्न जुनैद दुर्राणी यांनी उपस्थित केले आहेत. विषय बंडखोरीचाच असेल, तर तुम्ही तर साक्षात बंडोबा आहात. तुमचे हे आरोप ऐकल्यानंतर गेल्या निवडणुकीत जीवतोड मेहनत करून तुम्हाला निवडून आणले ही आमची निश्चितपणे चूक झाली अशीही टीका जुनैद दुर्राणी यांनी केली आहे. एकूणच महाविकास आघाडीतील बंडखोरीच्या निमित्ताने वरपुडकर व बाबाजानी यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहावयास मिळत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 pathri constituency rebellion suresh warpudkar babajani durrani print politics news ssb