नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील, मतदार संघातील विकास कामे, समस्या यांची मांडणी गरजेची असताना उत्तर महाराष्ट्रात अशा मुद्द्यांना केवळ ओझरता उल्लेख करून जातीय, धार्मिक विषय, एकमेकांच्या प्रमुख नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप, गद्दार-निष्ठावंत, लाडकी बहीण योजना याभोवतीच प्रचार फिरत राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, राहुल गांधी यांच्यापासून राज्यस्तरीय सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकसह जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हाणामारी, गोळीबार तसेच वादाच्या घटना घडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदार संघाचा अपवाद वगळता प्रत्येक मतदार संघात किमान पाचच्या पुढे उमेदवारांची संख्या असल्याने मत विभाजनाचे संकट महाविकास आघाडी आणि महायुती दोघांपुढे आहे. शहाद्यात केवळ तीन उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला कांदा उत्पादकांनी साथ दिल्याने विधानसभा निवडणुकीतही आघाडीकडून कांदाप्रश्न अधिक प्रमाणात प्रचारात आणला जाण्याची शक्यता होती. परंतु, विधानसभेचा प्रचार सुरू झाल्यापासून कांद्याच्या दरात चांगलीच सुधारणा झाली. दर कमी होण्याऐवजी वाढतच गेले. अर्थात, परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन बाजारातील आवक कमी झाल्याने परिणामी दर वाढले. केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादकांची दखल घेतल्याने दर वाढल्याचा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, चांदवड, कळवण, सटाणा, मालेगाव बाह्य या मतदारसंघांमध्ये करण्यात आला.

हेही वाचा : कोकण: मतदारांना ‘भावनिक साद’

कांदा उत्पादकांमधील नाराजी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत थोडी कमी झालेली असली तरी ती पूर्णपणे गेलेली नाही. त्यामुळे या मुद्द्यासह द्राक्ष उत्पादकांच्या समस्या मविआकडून, त्यातही राष्ट्रवादीकडून (शरद पवार) मांडण्याचा प्रयत्न झाला. धुळे आणि जळगाव जिल्ह्यात कापूस, सोयाबीनला मिळणारा कमी भाव, केळी उत्पादकांचे विषय जोडीला आले. कापसाला प्रतिक्विंटल आठ हजार तर, सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रचार सभांमध्ये विरोधकांकडून मागणी आणि सत्ताधाऱ्यांकडून आश्वासन यापुरतेच हे विषय मर्यादित राहिले. नंदुरबार या आदिवासीबहुल जिल्ह्यात पेसा भरती प्रक्रिया रखडल्याने आदिवासी युवावर्गात असंतोष आहे. याशिवाय, आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा मुद्दाही नंदुरबारमध्ये चर्चेत राहिला. आदिवासींची मते दूर जाऊ नयेत, यासाठी सत्ताधारी मंत्री, आमदारांनाही या विषयावर विरोधाची भूमिका घेणे भाग पडले. याखेरीज काश्मीरमधील कलम ३७०, मणिपूर, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील स्थिती, आरक्षण या राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रमुख नेत्यांकडून अधिक भर देण्यात आला.

हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्र: महायुतीची व्यूहरचना; ‘मविआ’चे व्यूहभेदन

घोषणांचा सुकाळ

जाहीर सभांदरम्यान मविआ, महायुतीकडून आश्वासने, घोषणांची खैरात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सभेत मोलगी आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सभेत मालेगाव या जिल्ह्यांची निर्मिती महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर करण्यात येईल अशी घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यासाठी नाशिकला जे जे हवे ते सर्व देण्यासह आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी महिलांना तीन हजार रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे तर, शरद पवार यांनी कृषिमालाला योग्य भाव, महागाईवर नियंत्रण यासारखे आश्वासन दिले.

हाणामारीच्या घटना

नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मतदारांना पैसे वाटपाच्या तक्रारींवरून झालेले वाद थेट हाणामारीपर्यंत पोहचले.

हेही वाचा : विदर्भ: ‘कटेंगे’ ते सोयाबीनपर्यंत प्रचाराची धार

जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघांत शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार तथा आमदार सुहास कांदे यांच्याकडून तसेच समर्थकांकडून अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडले.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या कार्यकर्त्यांना एका प्रचार फेरीदरम्यान मारहाणीचा प्रकार घडला.

मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार ताफ्यावर तसेच जळगाव शहर मतदार संघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर गोळीबाराचे प्रकार घडले.

प्रमुख नेत्यांच्या सभा

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, काँग्रेसकडून राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, राष्ट्रवादीकडून ( शरद पवार) शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव आदी प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी जाहीर सभा झाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 north maharashtra political parties campaigning focus on caste religion issues print politics news css