सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदावरून खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या दोन्ही राजांच्या मनोमिलनाच्या बातम्यानंतर सर्व सुरळीत होईल असे वाटत असताना पुन्हा एकदा मतभेद उडू लागले आहेत.

नगरपालिकेसाठीचे जागावाटप आणि नगराध्यक्ष पदावरून ही संबंध दोन्हीकडूनही ताणले आहेत. त्यामुळे दोघांनीही आता ५०- ५० उमेदवार तयार ठेवले आहेत. दोघांकडूनही नगराध्यक्ष पदासाठी दावे प्रतिदावे सुरू आहेत. कोणताही गट मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे आता याच्यातून काय निष्पन्न होणार याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.

राजघराण्याच्या इतिहासात साताऱ्याची थोरली पाती आणि कोल्हापूरची धाकटी पाती अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. याच थोरल्या पातीचे वारसदार म्हणजे उदयनराजे यांचे वडील प्रतापसिंह राजे यांनी छत्रपती घराण्याच्या वतीने पहिल्यांदा राजकारणात उडी घेतली.ते साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झालं. प्रतापसिंहराजेंचा राजकीय वारसा त्यांच्या धाकट्या बंधूंच्या कडे म्हणजे अभयसिंहराजे भोसलेंकडे आला.

अभयसिंह राजे यांनी १९७८ साली जनतादलाकडून पहिली विधानसभा लढवली आणि ते आमदार बनले. तिथून पुढे सातारा शहर आणि विधानसभा मतदारसंघावर अभयसिंहराजे यांचेच वर्चस्व राहिलं. पुढे ते कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले मंत्री झाले.

दरम्यान उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे यांनीही १९८९ मध्ये राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अभयसिंहराजे यांच्या विरुद्ध विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी दिली. कल्पनाराजे पराभूत झाल्या. मात्र यातून त्यांनी उदयनराजेंसाठी राजकीय पाया रचून ठेवला. उदयनराजे यांच्याबद्दल सुरवातीपासूनचं सातारकरांमध्ये खूपच आकर्षण राहिल आहे. अगदी शत्रूला देखील मदत करण्याचा दिलदारपणामुळे उदयनराजे साताऱ्यात लोकप्रिय आहेत.

वडिलांच्या प्रमाणेच राजकारणाची सुरवात त्यांनी सातारा पालिकेपासून केली. १९९१ सालच्या निवडणुकीत त्यांनी अभयसिंहराजे यांच्या विरोधात रयत विकास आघाडीची स्थापना केली. काकांना फक्त आव्हान दिलं नाही तर वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी कोणत्याही पक्षाची मदत न घेता ते नगरसेवकही झाले. मात्र ते आघाडीसह पालिका जिंकू शकले नाहीत. इथून त्यांच्या राजकारणाची सुरवात झाली.

१९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी १ लाख १३ हजार ६८५ अशी मोठी मते मिळवत आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात उदयनराजे या नावाची चर्चा सुरू झाली.

१९९८ साली अभयसिंहराजे भोसले लोकसभेवर गेले आणि त्यांच्या मोकळ्या झालेल्या विधानसभेच्या जागेवर शिवेंद्रसिंह राजे विधानसभेचे उमेदवार झाले. घराणेशाहीचं शीतयुद्ध महायुद्ध बनलं. उदयनराजेंना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपकडून उमेदवारी दिली. राज्यात युती सरकार होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांनी आपली सगळी ताकद उदयनराजे यांच्या पाठीशी लावली.

पहिल्यांदाच उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे हे दोन चुलत भाऊ एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले. अटीतटीच्या लढतीत अखेर शिवेंद्रसिंहराजे यांचा पराभव झाला. कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर उदयनराजे आमदार बनले, एवढंच नाही तर गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना थेट मंत्रीही बनवलं. १९९९ सालच्या विधानसभा निवडणुक अभयसिंह राजे यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काका पुतण्या यांच्यातील ही हाय प्रोफाइल लढाई चांगलीच गाजली. याच निवडणुकीच्या आदल्या दिवशी अभयसिंह राजे गटाच्या नगरसेवकाचा शरद लेवे याचा खून झाला. या निवडणुकीत उदयनराजे पराभूत झाले.

लेवे खून खटल्यात उदयनराजेंना अटक झाली. छत्रपतींच्या वारसदाराला चक्क २२ महिने तुरुंगात काढावी लागली. हा उदयनराजे यांच्यासाठी कठीण काळ होता. उदयनराजे निर्दोषत्व सिद्ध झाले व त्यांची मुक्तता झाली. परत आल्यावर त्यांनी अभयसिंहराजे यांचा पालिकेच्या निवडणुकीत मोठा पराभव केला व आपण आजून संपलेलो नाही हे दाखवून दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत प्रत्येक निवडणुकीला दोघे चुलत भाऊ त्वेषाने टक्कर देत होते.

२००४ साली अभयसिंह राजे भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मोकळ्या झालेल्या सातारा विधानसभेच्या जागी शिवेंद्रसिंह राजे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली ते आमदार झाले. सहानुभूतीच्या लाटेत उदयनराजे यांचा मोठा पराभव झाला.

दोन भावंडांमध्ये दोघांचे चुलते शिवाजीराजे भोसले यांनी मध्यस्थी करत राजघराण्यातील एकोप्यासाठी दोघांनाही एकत्र आणले. हे मनोमिलन पुढे दहा वर्षे टिकले. उदयनराजे यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. उदयनराजे लोकसभा आणि शिवेंद्रसिंहराजे विधानसभा अशी वाटणी देखील झाली. येणाऱ्या सगळ्या निवडणुका दोघांनी सहज जिंकल्या.

२०१६ सालच्या पालिका निवडणुकीवेळी. उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या वर थेट हल्ला केला. खुप वर्षांनी साताऱ्यात पुन्हा हाय व्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जनतेतून थेट निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंह राजे यांच्या पत्नी वेदांतिका राजे पराभूत झाल्या. उदयनराजे गटाच्या माधवी कदम विजयी झाल्या. हा पराभव शिवेंद्रसिंहराजे यांना जिव्हारी लागला. त्यातून मागील अनेक वर्ष सातारा शहरातील राजकीय वातावरण सतत गरम राहिले. दोन्ही गटात सतत वाद सुरू राहिले.

त्यातूनच शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयन राजे यांच्या विरुद्ध आक्रमक व्हायचं ठरवलं. त्यावेळी उदयनराजे आक्रमक होतेच. त्यांच्या या आक्रमकपणाचे सातारकरांना खूपच आकर्षण होते. तर दुसरीकडे शिवेंद्रसिंहराजे शांत संयमी होते. नंतर शिवेंद्रसिंहराजेही आक्रमक झाले आणि सरळ उदयनराजेंना भिडू लागले. यातून त्यांच्याही समर्थनातील गर्दी वाढू लागली. दोन्ही राजेंची भांडणे अगदी टोल नाक्यावर देखील गाजू लागली. या टप्प्यावर अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिष्टाई देखील कामी आली नाही. शेलक्या भाषेतील टीकाटिप्पणी मुळे छत्रपती घराण्यातील भाऊबंदकी राज्यभरात गाजू लागली.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतील विजया नंतरही उदयनराजे यांनी भाजप प्रवेश केला. शिवेंद्रसिंहराजेही भाजपमध्ये आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन राजांना पुन्हा एकत्र आणले. केवळ एकत्र आणले असेच नाही तर त्यांच्यात जिव्हाळा तयार करण्याचे श्रेय ही फडणवीस यांना जाते.

एकीच्या या बळावरच २०२४ मध्ये उदयनराजे भाजपचे लोकसभेचे खासदार झाले. तर शिवेंद्रसिंहराजे राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

अभयसिंहराजे यांच्या नावाने होणाऱ्या बाजार समितीच्या आवारातील संकुलाच्या भूमिपूजन वेळी दोघांमध्ये शेवटचे वाद झाले. दोघांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली दिलजमाई ही अद्यापही कायम आहे. उलट त्याला आता प्रेमाचे फुलारे फुटत आहेत. राज्याच्या राजकारणात दोघेही प्रभावी नेते ठरत आहेत.

शहरातील राजकीय वर्चस्वासाठी, टोलवसुलीसाठी, मालमत्तेसाठी वाद घालणारे हे दोन्ही राजे साताऱ्याच्या विकासासाठी आता एक दिलाने एकत्र आले आहेत. मागील कडू गोड अनुभव विसरून दोन्ही राजे पेन्शनरांच्या जुन्या सातारा शहराला आता नव्या आकर्षक विकासात बदलत आहेत. या निवडणुकीत पुन्हा संबंध ताणले जातील की काय अशी सातारकरांमध्ये चर्चा आहे.

वेदांतिका राजे यांच्या पराभवानंतर उदयनराजे यांची पालिकेवर सत्ता होती. दोघांमधील सध्याच्या चांगल्या नाते संबंधांमुळे शहराच्या विकासामध्ये दोघेही गतीने काम करत आहेत. त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा आता पूर्णपणे बदलत आहे.

यावेळी साताऱ्याचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. नगराध्यक्ष पदावर दोघांमध्येही रस्सीखेच सुरू आहे. दोघांकडेही चांगले उमेदवार आहेत. बैठकावर बैठका सुरू आहेत. राजघराण्याचे ज्येष्ठ नेते (कै.) शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या व दोघांच्या चुलत भगिनी वृषालीराजे भोसले, तसेच शिवेंद्रसिंह राजे यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले या दोन नावांचीही जोरदार चर्चा आहेचं. सातारा पालिकेत नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदाच्या ५० जागा आहेत. दोघांनाही भाजपाने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची सूचना केली आहे. यासाठी दोघांमध्येही जागावाटप झाले आहे. यातूनच मनोमिलन झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र नगराध्यक्षपदावरून हे संबंध पुन्हा ताणले गेले आहेत.

सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जर नगराध्यक्षपदावरून जमले नाही तर दोघांनीही आपले ५० उमेदवार तयार ठेवले आहेत. ५०० इच्छुकांमधून उमेदवार ठरविताना दोघांचीही कसोटी लागत आहे. ऐनवेळी तडजोडीच्या मुद्द्यावर राजघराण्यातील कोणाचेही नाव पुढे येऊ शकते. राजकारणाचे धडे गिरविण्याची वेळ आल्यास राजघराण्याचा आदेश निघाल्यास इच्छुकांना आपले दावे मागे घेत गप्प बसावे लागेल. याचे सातारकरांना कोणतेही आश्चर्य वाटणार नाही. मिळेल तो उमेदवार स्वीकारणे इच्छुकांसह सर्वांनाच मान्य करावा लागेल हे मात्र नक्की.