सांगली : ना कोणती ईडी चौकशीची भीती, ना कोणती संस्था अडचणीत, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.
पुढील वर्षी होणार्या पुणे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी नजरेसमोर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट आहे. या मतदार संघाचे विद्यमान आमदार अरूण लाड यांचे ते चिरंजीव असून भविष्यातील राजकीय महत्वकांक्षा म्हणूनच हा प्रवेश होत असल्याचे मानले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला धक्का तर बसलाच आहे. याचबरोबर पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या मतपेढीवरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुंडल म्हटले की प्रथम आठवण होते क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्वातंत्र्यचळवळीतील करारी नेतृत्वाची. त्यांचा डावा विचार घेउनच कुंडलच्या भूमीत काँग्रेसतेर पुरोगामी चळवळ वाढली. याच विचारातून क्रांती कारखान्याची उभारणी झाली. कृष्णेचे पाणी पिऊन इथली जमिनीची उत्पादकता वाढली. सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या माध्यमातून उसाचे मळे फुलले. आज क्रांती कारखान्याचे व्यवस्थापन अत्यंत कुशल आणि व्यावसायिक पध्दतीने चालत असल्याचे दिसून येते, ते जीडी बापूंचा विचार आणि विद्यमान आमदार अरूणअण्णा लाड यांचा दूरदर्शीपणा. आता याच कुटुंबातील युवा नेतृत्व शरद लाड भाजपमध्ये मध्ये डाव्या विचाराकडून उजव्या विचारसरणीचा वाटेवर आहे. यामागे वैचारिक बैठकीपेक्षा राजकीय भवितव्याचा विचार महत्वाचा ठरला असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात राहून राजकीय भवितव्य उज्वल होईलच याची खात्री नसल्याने लाड भाजप प्रवेशासाठी राजी झाले असेच म्हणावे लागेल.
विधानसभा निवडणुकीत फारसे भवितव्य नसल्याने आमदार लाड यांनी पदवीधर मतदार संघासाठी दहा वर्षापुर्वी बांधणी केली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने त्यांच्या ऐवजी सारंग पाटील यांना उमेदवारी दिली. लाड यांच्या बंडखोरीमुळे आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. या पराभवाने खचून न जाता आमदार लाड यांनी मागील निवडणूक भाजपचे संग्राम देशमुख यांच्याविरूध्द लढवली. त्यावेळी मतदार नोंदणीपासून निवडणुकीची यंत्रणा शरद लाड यांनीच हाताळली. सोलापूरातून शरद लाड यांचे सासरे बबन शिंदे, संजयमामा शिंदे यांची मदतही मोलाची ठरली. पूर्वनियोजन व्यवस्थित केल्याने ४८ हजार ८२४ मतांनी अरूण लाड आमदार झाले.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पुणे पदवीधर मतदार संघ पुण्यासह सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या चार जिल्ह्यातील ५४ विधानसभा मतदार संघ आहेत. यापैकी सुमारे ४० विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत. निवडणुकीत चार ते साडेचार लाख मतदार नोंदणी अपेक्षित असून हा सर्व मतदार सुशिक्षित असल्याने प्रचाराची पध्दतही वेगळीच राहते. भाजपचा हा पारंपारिक मतदार संघ. मात्र मिरजेचे प्रा. शरद पाटील यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत या मतदार संघावर पुरोगामी विचाराचाही आमदार होउ शकतो हे सिध्द केले आहे. यामुळे या मतदार संघात काहीही घडू शकते हा इतिहास आहे.
आता शरद लाड भाजपमध्ये पुणे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी नजरेसमोर ठेवूनच भाजपमध्ये दि. ७ ऑक्टोबरला प्रवेश करत आहेत. पदवीधरच्या उमेदवारीसाठी भाजपमध्येही इच्छुक आहेत. भाजपचे या मतदार संघाची जबाबदारी सरचिटणीस राजेश पांडे यांच्यावर सोपवली आहे. उमेदवारीसाठी पांडे यांच्यासह मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, प्रशांत परिचारक हेही उमेदवारीच्या चर्चेत येउ शकतात. यामुळे लाड यांना निवडून येण्यासाठी जितका संघर्ष करावा त्यापेक्षा अधिक संघर्ष उमेदवारीसाठीही करावा लागणार आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत मतदार नोंदणीपासून केलेले नियोजन ही त्यांच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. निवडणुकीला अजून एक वर्ष असल्याने तोपर्यंत राजकीय पूलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे हेही तितकेच खरे.
