राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये संभाव्य सामंजस्याच्या अंदाजावर शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे काही दिवसांपूर्वीच दिसून आले. दोन्ही राष्ट्रवादी गटांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम केले, तर ते चांगलेच आहे. चांगल्या कामासाठी मतभेद बाजूला ठेवले, तर चांगलंच आहे, असे शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. असं असताना दोन्ही पक्षांनी युतीच्या दिशेने गंभीर पाऊल टाकल्याचे कोणतेही सकेत त्यानंतर दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा बदल घडवून आणेल आणि त्यामुळेच शरद पवारांच्या या वक्तव्याला महत्त्वदेखील आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सामील होण्यासाठी काकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने लढविलेल्या १० जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवला होता. तर अजित पवार गटाला फक्त एकच जागा जिंकता आली होती. असं असताना परिस्थिती अजित पवारांच्या बाजूनं अनुकूल होती. कारण- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ४१ जागा मिळाल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही महत्त्वाचं स्थान असलेल्या शरद पवारांसाठी हा पराभव अत्यंत अपमानजनक होता. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी असे प्रतिपादन केले होते की, त्यांचा पक्ष सत्तेसाठी भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी युती करणार नाही. “आम्ही भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्यांसोबत एकत्र येणार नाही. आम्ही फक्त गांधी, शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबतच राहू शकतो”, असे वक्तव्य शरद पवारांनी अलीकडेच पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान केले होते.
दरम्यान, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, २०२३ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सामील होण्याचा निर्णय हा केवळ अजित पवारांचा नाही, तर सामूहिक होता आणि त्यांनी संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळी फेटाळून लावल्या.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या अफवा का पसरत आहेत?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य युतीबद्दल अलीकडेच अटकळ वाढली होती. दोन्ही पवार अनेक वेळा एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यामुळे एकमेकांशी जुळवून घेण्याच्या अफवांना आणखी खतपाणी मिळाले होते. त्याशिवाय मालेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार यांनी लक्षणीय विजय मिळवला आहे. त्यांच्या श्री निलकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकल्या आहेत; तर शरद पवारांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही. मालेगाव साखर कारखाना हा या भागातील सर्वांत जुना व सर्वांत शक्तिशाली सहकारी संस्थांपैकी एक आहे. अजित पवार यांच्या विजयामुळे बारामतीच्या सहकारी राजकारणावर त्यांची पकड आणखी मजबूत झाली आहे. शरद पवारांपासून वेगळे असतानाही त्यांना एक प्रभावशाली राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख सिद्ध करता आली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मनसेचे राज ठाकरे यांच्यात संभाव्य युतीच्या वृत्तांदरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचीही चर्चा होत आहे.
ठळक मुद्दे:
- दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये विलिनीकरणाच्या अफवा
- महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम केले तर ते चांगलेच – शरद पवार
- मालेगावच्या विजयाचा अजित पवारांना भविष्यात फायदा
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा बदल घडवून आणेल
- अजित पवार पवारांचे कायदेशीर वारसदार ठरू शकतात का
मालेगावची निवडणूक अजित पवारांसाठी का महत्त्वाची?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अखेर २०२९ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार तयारी करीत असल्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. या विजयासह त्यांच्या काकांच्या निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या प्रदेशात त्यांचे पुन्हा एकदा कथित नियंत्रण आले आहे. एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामतीचा भाग आता अजित पवारांचे वाढते वर्चस्व सिद्ध करीत आहे.
सहकार बचाव पॅनेलचे नेतृत्व करणारे व अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेले सहकारी नेते चंद्रराव तावरे आणि त्यांचे पुत्र रंजनकुमार यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राज्य यंत्रणेचा अनावश्यक वापर करून हा विजय मिळविल्याचा आरोप तावरे यांनी केला. अजित पवारांच्या गटावर मतदारांवर दबाव आणण्याचा आणि परिसरात संसाधनांचा पूर आणण्याचा आरोप त्यांनी केला. “हा विजय नैतिकतेवर आधारित नाही. उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेले वचन लक्षात ठेवले पाहिजे. पुढील पाच वर्षांत त्यांना सर्वोत्तम भाव देण्याचे आश्वासन पाळावे आणि ते पूर्ण करतात की नाही ते पाहूया”, असे तावरे यांनी म्हटले होते.
अजित पवारांच्या राजकीय वाटचालीसाठी हे किती महत्त्वाचं?
निर्णायक विजयासह अजित पवार यांनी हेदेखील सिद्ध केलं आहे की, ते ग्रामीण सहकारी पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवतात आणि नेमकं हेच स्थानिक पातळीवर मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या सहकारी संस्था ग्रामीण महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेचा कणा आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्यानं चांगला समन्वय, निधीची उपलब्धता व स्थानिक पातळीवर प्रत्येक मतदारसंघात मनुष्यबळ सुनिश्चित होते. ही मालमत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याशिवाय या विजयामुळे महायुती आघाडीतही अजित पवारांचं स्थान अधिक बळकट होण्यास मदत होईल. त्यामुळे जागांच्या मोठ्या वाट्यासाठी आणि सरकारी निर्णयांवर धोरणात्मक प्रभावासाठी ते जागावाटपासंदर्भात अधिक प्रयत्नशील राहू शकतात. राजकीयदृष्ट्या मालेगावचा विजय अजित पवारांना पवारांचा कायदेशीर वारसदार म्हणून आणखी मजबूत असल्याचे सिद्ध करतो. दोन्ही पवार पुढील निवडणूक लढविण्याची तयारी करीत असताना सध्या तरी पारडं अजित पवारांच्या बाजूनं झुकल्याचं स्पष्ट दिसत आहे