Maharashtra Political Top News Today : महाराष्ट्रात आज दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचा दावा केला जात आहे. अंजली दमानिया यांनी उद्या पत्रकार परिषद घेत मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, “मी कंत्राटदाराला खोलीत दरवाजा बंद करून बदडून काढण्याची धमकी दिली,” असा खुलासा नितीन गडकरींनी केला आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर राजन साळवींच्या मुलाने भावनिक पोस्ट केली आहे आणि भाजपाच्या तीन इच्छुक उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊयात…
शिंदे गटातील मंत्र्यांच्या भाजपा प्रवेशाने मंत्र्यांची नाराजी
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने राजकारण तपल्याचे पाहायला मिळत आहे. निषेध म्हणून मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचा दावा केला जात आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग चालू आहे. अनेक मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांचं प्रभारीपद आहे. त्यामुळे काही मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. इथे नाराजीचा कुठलाही विषय नाही.”
“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेही काही मंत्री त्यांच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे व अजित पवार) या बैठकीला उपस्थित होते. आताही त्यांची वैगळी बैठक चालू आहे. नुकतीच इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक पार पडली. आता वनविभागाची बैठक चालू आहे. मात्र, प्रसारमाध्यमं जी बातमी दाखवत आहेत तसे काहीच नाही,” असेही त्यांनी सांगितले.
अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आक्रमक झाल्या आहेत. दमानिया पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यांना त्या जमीनीची पाहणी करण्यापासून रोखण्यात आले. दमानिया यांनी आक्रमक होत थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच उद्या पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले.
“मी आतापर्यंत जे विषय लढत आहे, त्या विषयांची मी संपूर्ण माहिती घेऊनच बोलते. आता या प्रकरणात ही जमीन नेमकं कुठे आहे? त्याचं लोकेशन काय? त्या जमीनीची सध्याची स्थिती काय? याबाबत तेथील अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मुंढवा येथे आले होते. त्यानंतर मला येथील लोकांनी सांगितलं की परवानगीशिवाय आम्ही तुम्हाला आत सोडणार नाही. त्यानंतर मी या बोटॅनिकल गार्डनच्या डायरेक्टरांना फोन केला. मात्र, ते अतिशय उद्धटपणे बोलले. त्यामुळे आता मी या प्रकरणात अधिकाऱ्यांकडून आणखी माहिती घेऊन उद्या एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहे”, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला.
नितीन गडकरींचा कंत्राटदाराला धमकी दिल्याचा खुलासा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या आयआयएममध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एका कंत्राटदाराला थेट खोलीत दरवाजा बंद करून बदडून काढण्याची धमकी दिली होती, असा खुलासा केला. नागपूर आयआयएममध्ये कार्यक्रम असल्याने गडकरींनी यावेळी शासकीय यंत्रणेवही टीका केली. आयआयएम नागपूरची इमारत बांधण्यासाठी नियम डावलून खासगी कंत्राटदाराला काम दिले. दर्जेदार डिजाइन तयार करणाऱ्यांची एक स्पर्धा घेतली. त्यानंतर एकाची निवड करून काम दिले. त्यामुळे आज आयआयएमची सुंदर अशी इमारत उभी आहे.
मात्र आयआयएमच्या बाजूला असलेल्या एम्समध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा पूर्ण प्रभाव सोडला आहे. मी हे म्हणू शकतो कारण मी सरकारमध्ये आहे. मी गध्याला घोडा कसा म्हणू, असा प्रश्नही गडकरींनी केला. त्यातील मोठ्या कंत्राटदाराने खूप बेकार कामे केली. त्याने माझ्याकडून खूप शिव्या खालल्या. त्याला सांगितले की, दरवाजा बंद करून खूप ठोकेन, आयुष्यभर लक्षात राहील, अशा शब्दात बजावल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी नागपूर महापालिकेमध्ये कंत्राटदार आणि काही अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या विविध कामांवर नाराजी व्यक्त केली.
राजन साळवींच्या मुलाची भावनिक पोस्ट
रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेने (शिंदे) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारण तापले आहे. शिवसेनेची (ठाकरे) साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे राजन साळवींना मोठा धक्का बसला आहे. अथर्व साळवी यांनी एक भावनिक पत्र लिहून समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे.
त्यांनी लिहिले, “मी अथर्व राजन साळवी रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग १५ मधून आपल्यासाठी लढण्याची माझी मनापासून इच्छा होती. परंतु महायुतीच्या निर्णयामुळे मला या निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे आणि हे सांगताना मन खरंच जड झालं आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व ज्येष्ठांचे हात, मित्रपरिवाराची साथ, खांद्यावरची थाप देणं, हे सगळं विसरणं माझ्यासाठी शक्यच नाही. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास हे माझं खरं बळ आहे.”
भाजपाच्या तीन इच्छुक उमेदवारांनी भरला शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज
रत्नागिरी नगरपालिकासाठी इच्छुक उमेदवारांची नाराजी महायुतीला भारी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपाच्या उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे. भाजपामधील तीन माजी नगरसेवकांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळवण्यात यश आले आहे. यामुळे महायुतीचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद निवडण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती व महाविकास आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य घडल्याचे दिसून आले. रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे तीन प्रमुख इच्छुक उमेदवार आता थेट शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
