पिंपरी- चिंचवडमध्ये चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप शिवराम गायकवाड असे अटक केलेल्या आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे. दिलीप हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तक्रारदार हे दिलीपचे आणि रिक्षाचे अर्धवट वर्णन सांगत होते. अखेर दिलीपच्या रिक्षावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्टिकर होते अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ३०० ते ४०० रिक्षा तपासून पैकी दिलीपच्या रिक्षाचा शोध लावला. अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. दिलीपकडून पाच मोबाईल आणि रिक्षा पोलिसांनी जप्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकाला भोसरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिलीप भोसरीच्या पीएमटी चौकातून रिक्षात प्रवाशी बसवायचा. प्रवाशांची दिशाभूल करून अनोळख्या ठिकाणी नेऊन लुटत असे. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन प्रवाशांकडून रोख रक्कम आणि मोबाईल काढून घ्यायचा. प्रवाशांना तिथेच सोडून रिक्षा घेऊन दिलीप पसार व्हायचा. याबाबत ची तक्रार भोसरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालक दिलीपचा शोध घेण्यास सुरुवात केली. तक्रारदार यांनी रिक्षाचे वर्णन सांगितले, पुसट दिसलेला नंबर देखील सांगितला. स्पष्ट असे काही पुरावे पोलिसांकडे नव्हते. त्यामुळे दिलीपला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तक्रारदार यांनी रिक्षावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्टिकर असल्याची माहिती दिली. तेवढ्या पुराव्यावरून भोसरी आणि इतर परिसरातील ३०० ते ४०० रिक्षा तपासून दिलीपच्या रिक्षाचा शोध लावून दिलीपला बेड्या ठोकण्यात भोसरी पोलिसांना यश आले.

ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, पोलिस कर्मचारी राकेश बोईने, सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार वराडे, आशिष गोपी, प्रतिभा मुळे, संतोष महाडिक, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे, सुभाष पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rickshaw driver who robbed passengers with a knife on his neck was arrested pune kjp 91 amy