पुणे : ‘निवडणुका जिंकण्यासाठी आणि खुर्ची टिकविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जाती-धर्मांत दंगली घडवून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. दोन समाजांतील कटुतेच्या भिंती वेळीच दूर केल्या नाहीत, तर देशात आग लागून त्याची झळ सर्वानाच बसेल,’ असे मत ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादून मुसलमीन’ (एआयएमआयएम) पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘देशात धर्माचा ‘धंदा’ जोरात सुरू असून, सुशिक्षित लोकही आंधळेपणाने त्याला बळी पडत आहेत. सरन्यायाधीशांवर बूटफेक ही लोकशाहीतील सर्वांत लाजिरवाणी गोष्ट आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे कोथरूड येथील गांधी भवनात आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचा समारोप झाला. त्यावेळी ‘महात्मा गांधी आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर इम्तियाज जलील बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. शिवाजी कदम, सचिव अन्वर राजन, डॉ. एम एस जाधव, स्वप्नील तोंडे यावेळी उपस्थित होते.
जलील म्हणाले, ‘भाजपचे खासदार सहकारी मुस्लिम खासदाराला उद्देशून संसदेत आक्षेपार्ह शब्द वापरतात. संसदेचे अध्यक्ष ते शांतपणे ऐकून घेतात. त्याच वेळी या खासदारावर निलंबनाची कारवाई झाली असती, तर राज्याच्या विधानसभेत भांडणे करण्याची कोणाची हिंमत झाली नसती. संसदेत कायदे करणारे अल्पशिक्षित आहेत आणि विविध पदांच्या भरतीसाठी शिक्षणाची अट ठेवली जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी होण्यासाठीही शिक्षणाची अट आवश्यक आहे.’
‘देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी एकात्मतेची भावना आवश्यक आहे. सर्व लोकांचा विकास झाल्यानंतरच देश पुढे जाऊ शकेल. स्वातंत्र्यासाठी लढताना कोणी जाती-धर्माचा विचार केला नाही. मात्र, आता देशभक्तीचे प्रमाणपत्र एकाच धर्माच्या नागरिकांकडे मागितले जाते. देशात कुठेही औरंगजेबाचा जन्मदिवस साजरा केला जात नाही. तरीही आम्हाला सतत त्याबाबत प्रश्न विचारणे खेदजनक आहे,’ अशी खंतही जलील यांनी व्यक्त केली. कुमार सप्तर्षी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘…तर मुख्यमंत्र्यांना २० हजार रुपये बक्षीस’
‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा प्रवास एकदा करून दाखवावा. त्यांना मी २० हजार रुपये बक्षीस देईन. या रस्त्यावरून येण्यासाठी मला आठ तास वेळ लागला. विकासाच्या नावावर गप्पा मारणारे साधा रस्ता देखील विकसित करू शकत नाहीत,’ अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.
एकनाथ शिंदेंवर आरोप
‘लोकसभा निवडणुकीवेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी हेलिकाॅप्टरने ५० कोटी आणले होते. या पैशांचे वाटप पोलिसांच्या गाडीतून निवडणुकीपूर्वी तीन दिवस आधी करण्यात आले. असे प्रकार करून निवडणूक जिंकण्यात काय अर्थ आहे,’ असा आरोपही जलील यांनी केला.