पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केल्यामुळेच मागील निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना मते मिळाली होती. पण, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसे यांची भूमिकाही कोल्हे यांनी केली. हा किती विरोधाभास आहे. पैशासाठी कोणतीही भूमिका करत असून त्यांना तत्व नसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्यांच्याकडे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नसल्याचेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारासाठी पवार यांची आंबेगावातील घोडेगाव येथे बुधवारी (८ मे) सभा झाली. शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा…चाकण एमआयडीसीत एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला प्लॉट देऊन केला कोट्यवधींचा भ्रष्टाचार! स्थानिकांचा रोजगारही हिरावला

कोल्हे यांना शोधून आणून उमेदवारी दिली. जीवाचे रान करुन निवडून आणले. मात्र, दोन वर्षांनी मी अभिनेता असल्याचे सांगत राजीनामा घेऊन आले होते, असे सांगत पवार म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ ला शरद पवार यांना संधी दिली. त्यामुळे ते आपले नेतृत्व सिद्ध करु शकले. पण, पवार यांनी १९८४ ला चव्हाण यांची साथ सोडल्याचे इतिहास सांगतो. मला शरद पवार यांनी संधी दिली. पण, आता आम्हाला म्हणतात या वयात पवार यांना सोडायला नको होते. त्यांनी १७ वर्षांत चव्हाण यांना सोडले. मी तर ३५ वर्षे साथ दिली. कारभार बघू द्या म्हटले पण बघू देत नव्हते. चूक केली तर आमचे कान धरा, पण काम करु द्या असे सांगत होते. पण, ऐकत नव्हते. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची आम्ही विचारधारा सोडली नाही. त्याच विचारधारेने पुढे जात आहोत. सत्ता असल्याशिवाय लोकांना मदत करु शकत नाही. सत्ता नसल्यावर काही कामे करता येत नाहीत. निधी देता येत नाही, त्यासाठी सत्तेत गेलो, असेही ते म्हणाले.

लोक स्वार्थी

शरद पवार आजारी आहेत. तरीही लोक त्यांना प्रचारासाठी बोलवितात. लोक स्वार्थी असतात. जोपर्यंत हातपाय व्यवस्थित आहेत. तोपर्यंत लोक आमच्या मागे येतात, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा…कोणी रडलं, काही झालं तरी सुनेत्रा पवार पाच हजारांच्या मताधिक्याने जिंकतील – महादेव जानकर

रडून प्रश्न सुटणार नाहीत

यापूर्वी लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला दिलीप वळसे-पाटील यांना मतदान होत असे. आता ते दोघेही एकत्र आहेत. त्यामुळे मोठे मताधिक्य मिळाले पाहिजे. कोल्हे यांनी पाच वर्षात पुणे-नाशिक रेल्वे, वाहूतक कोंडी सोडविण्यासाठी काहीच केले नाही. आता भावनिक करतील. रडून प्रश्न सुटणार नाहीत. रडून राजकारण करायचे नसते. आरेला-कारे करुनच राजकारण करायचे असते, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticize amol kolhe over nathuram godse role and said kolhe has no time to do people s work but want to do films pune print news ggy 03 psg