पुणे : जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. याच वेळेस खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार दिलीप मोहिते पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. कोल्हे हे उमेदवारी अर्ज सादर करायच्या वेळीच आमदार मोहिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्याने त्यांच्या ‘टायमिंग’ची चर्चा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खेडचे आमदार मोहिते हे देखील अजित पवार यांच्यासोबत आहेत. मोहिते यांनी शिरूर मतदारसंघातून बाहेरचा उमेदवार नको, असे म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोरदार विरोध केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेतली. अलीकडेच त्यांनी विद्यमान खासदार कोल्हे यांच्यावर टीका देखील केली.

हेही वाचा..विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा

दरम्यान, बारामती मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज विधानभवन येथील निवडणूक निर्णय कार्यालयात दाखल करण्यात आला. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे या वेळी उपस्थित होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्याचवेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. ते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या दालनात गेले. मात्र, आपल्या उपस्थितीवरून ‘खल’ होण्यापूर्वीच तेथून ते बाहेर पडले. खासगी कामासाठी मोहिते हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, असे नंतर सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या या टायमिंगची चांगलीच चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar ncp s mla dilip mohite was present in same collector office when amol kolhe filled nomination form pune print news psg 17 psg
Show comments