पुणे : महाविकास आघाडी, तसेच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील रस्ते बंद ठेवण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागला. वाहनचालकांना दोन ते तीन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी पाच ते दहा किलोमीटरचा वळसा घालावा लागल्याने लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, तसेच सोमवार पेठेतील बहुतांश रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडाला.
बारामती, पुणे, शिरुर मतदारसंघातील उमेदवारांनी गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहर, तसेच जिल्ह्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी या भागातील रस्ते बंद ठेवण्यात येणार असल्याचे बुधवारी रात्री जाहीर केले. गुरुवारी सकाळी सहा ते दुपारपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, साधू वासवानी चौक, क्वार्टर गेट चौक, रास्ता पेठेतील शांताई हाॅटेल चौक परिसरातील रस्ते बंद ठेवण्यात आले होते. ब्ल्यू नाईल हाॅटेल चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शांताई हाॅटेल चौकात शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला मोठी गर्दी असल्याने तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा – कोंढव्यात बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून; इमारतीवरून फेकून दिले
कार्यकर्त्यांनी उपरस्त्यावर मोटारी लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. गुरुवारी सकाळी सहापासून घोरपडी ते साधू वासवानी चौक, क्वार्टर गेट चौक ते लष्कर भाग, शांताई हाॅटेल ते लष्कर परिसरातील रस्ते बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहराच्या मध्यभागात येणाऱ्या वाहनचालकांना वळसा घालून यावे लागले. घोरपडीहून येणारी वाहतूक रेसकोर्समार्गे वळविण्यात आली होती. साेमवार पेठेतील नरपतगिरी चौक, पाॅवर हाऊस चौक, संत कबीर चौक, तसेच पुणे स्टेशन परिसरातील आगरकरनगर, क्वीन्स गार्डन परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. गल्ली-बोळात कोंडी झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागला.
हेही वाचा – मोदींचा पराभव करायला तयार रहा, शरद पवार यांच्याकडून हल्लाबोल
विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी या भागातील रस्ते सकाळपासून बंद केले होते. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. पुणे स्टेशन, सोमवार पेठ, लष्कर भाग परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारनंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. – रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा